पर्यावरण खात्याच्या जाचक अटींमुळे
* चंद्रपूर जिल्ह्य़ातील ७५ रेतीघाट लिलावाच्या प्रतीक्षेत
* २५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ
* काळ्याबाजारात वाढीव दराने रेतीची विक्री
पर्यावरण खात्याच्या जाचक अटींमुळे या जिल्ह्य़ातील ७५ रेतीघाट लिलावाच्या प्रतीक्षेत असून त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यावसायिकांना बसल्याने किमान २०० कोटींची बांधकामे रखडली आहेत, तर रेती व्यवसायावर उदरनिर्वाह असलेल्या ट्रक, ट्रॅक्टर मालक, चालक, मजूर, बिल्डर व बांधकाम व्यावसायिक, अशा २५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर काही व्यावसायिक काळ्याबाजारातून तीन ते साडेतीन हजार रुपये दराने रेतीची विक्री करीत आहेत.
या जिल्ह्य़ातील रेती घाटाची लिज ३० सप्टेंबरला संपल्यानंतर आज दोन महिन्यांचा अवधी लोटला तरी नूतनीकरण झालेले नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अशा सलग चार महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे रेतीघाट पूर्णत: बंद होता. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या जिल्हाभरातील किमान एक हजार ट्रॅक्टर, ट्रक व अन्य छोटय़ा-मोठय़ा गाडय़ा उभ्या होत्या. त्यातच दसऱ्यापासून रेतीघाट सुरू झाले, परंतु आठवडाभर रेतीची उचल करत नाही तोच लिज संपल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व रेतीघाट बंद केले. आता रेतीघाटाच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी पर्यावरण खात्याच्या जाचक अटींमुळे घाट लिलावाला वेळ लागणार आहे. त्यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह असलेल्या जिल्हाभरातील एक हजार ट्रक व ट्र्ॅक्टर मालक, चालक, मजूर अशा किमान २५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने लिलाव प्रक्रिया तातडीने राबविले असते तर आतापर्यंत रेती उपसण्याच्या कामाला सुरुवात झाली असती, परंतु जिल्हा प्रशासनाच्या वतीने लिलाव प्रक्रियेला बराच विलंब होत असल्याची ओरड हा व्यवसाय करणाऱ्यांकडून होत आहे.
तसेच पावसाळ्यात सलग चार महिने गाडी घरीच उभी राहिल्याने बॅंक कर्ज घेऊन हा व्यवसाय करणाऱ्यांचे हफ्ते थकले आहेत. दुसरीकडे रेती मिळत नसल्याने शहरातील किमान २०० कोटींची बांधकामे कामे रखडल्याची माहिती एका बिल्डरने दिली. या शहराच्या चौफेर बिल्डरांच्या फ्लॅट स्किमची कामे सुरू आहेत. एका फ्लॅट स्किममध्ये किमान सहा फ्लॅटचे बांधकाम आहेत, तर मोठय़ा फ्लॅट स्किममध्ये किमान २५ फ्लॅट आहेत. मात्र, रेती लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने बांधकामेही थंडबस्त्यात आहेत. केवळ बिल्डरांची बांधकामे थांबलेली नाहीत, तर शासकीय, निमशासकीय व खासगी बांधकामेही थंडबस्त्यात आहेत. त्यातही केवळ चंद्रपूर शहरातील बांधकामावरच त्याचा परिणाम झालेला नसून तालुका व ग्रामीण भागातील बांधकामेही रखडली आहेत. यावर्षी पावसाळ्यात शासकीय कार्यालयांना व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व शाळांच्या इमारती गळायला लागल्या आहेत. ही सर्व कामेही यावर्षी घेण्यात आली असून रेती मिळत नसल्याने ती सारी थंडावली आहेत. महानगरपालिकेने शहरातील अनेक रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम हाती घेतले आहे, परंतु कंत्राटदारांना रेती मिळत नसल्याने ही सर्व बांधकामे थंडबस्त्यात आहेत. रेती, मुरूम व माती मिळत नसल्याचा सर्वाधिक फटका हा वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर व बामणी या मार्गाला बसला असून या रस्त्याचे कामावर त्याचा परिणाम झाला आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत, परंतु रेतीअभावी तीही रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महानगरपालिकेच्या तीन मजली इमारतीचे काम गांधी चौकात सुरू असले तरी रेतीअभावी ते रखडले आहे. आज रेती मिळत नसली तरी काही बांधकामे व्यावसायिक असून त्यांनी रेतीचा साठा करून ठेवलेला आहे. आता टंचाईच्या काळात ही रेती काळ्याबाजारात तीन ते साडेतीन हजार रुपयात दोनशे मिटर या दराने विक्री केली जात आहे. रेती मिळत नसल्याने अनेक पुलाचे बांधकामही थंडबस्त्यात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली, तर वरोरा नाका चौकातील पुलाच्या बांधकाम, रामनगर येथील जिल्हा क्षयरोग रुग्णालयात स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम धिम्या गतीने सुरू आहे. एकूणच पर्यावरण खात्याच्या जाचक अटीत रेती लिलाव रखडल्याने शहरातील बहुसंख्य बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.आवळे यांना विचारणा केली असता लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या एक दोन दिवसात लिलावाच्या जाहिराती वृत्तपत्रात प्रसिध्द केल्या जातील, अशी माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. मात्र, विलंब का होत आहे, याविषयी विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली.
आठवडाभरात रेती घाटाचे लिलाव
येत्या आठवडाभरात ई-ऑक्शनच्या माध्यमातून रेती घाटाचे लिलाव प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री संजय देवतळे व जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. रेती घाटामुळे अनेक बांधकामे रखडल्याचे बघता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशीही माहिती दिली. दरम्यान, लिलाव तातडीने झाला तरी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान पंधरा ते वीस दिवसाचा अवधी लागेल, अशी माहिती एका व्यावसायिकाने दिली.