श्री सूर्या समूहातील आर्थिक घोटाळ्यांची जंत्रीच आता एकापाठोपाठ एक उघड होऊ लागली असून एकूण २४७ कोटी रुपयांचा घोटाळा समूहाने केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. कंपनीचा मालक समीर जोशी याने हजारो गुंतवणूकदारांना अधिक व्याजाच्या आमिषात ओढून ही रक्कम गोळा केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून श्री सूर्या कंपनीच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम अहोरात्र सुरू होते. राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आता चौकशीची सूत्रे हाती घेतली असून ५०९२ गुंतवणूकदारांची एकूण २४७ कोटी रुपयांची राशी कंपनीने स्वत:कडे ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुंतवणूकदारांची नावे, त्यांनी गुंतवलेली रक्कम आणि खात्याची तपासणी केल्यानंतर एकूण रकमेची जोड करण्यात आली. ही राशी २४७ कोटींच्या घरात जात अल्याचे सूत्रांनी सांगितले. ही फक्त तत्त्वत: रक्कम असून व्याजाची राशी अद्याप काढायची आहे. ही राशी जोडल्यास हा घोटाळा पाचशे कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. गुंतवणूकदार आणि कंपनीच्या खात्याची तपासणी आणखी छाननी केल्यानंतर एकूण घोटाळा किती कोटींचा झाला, याचा अधिकृत आकडा निश्चित केला जाणार आहे. काही गुंतवणूकदारांना प्रारंभीच्या काळात कंपनीने पैसे परत दिल्याच्याही नोंदी आहेत. परंतु, अधिक व्याजाच्या हव्यासापोटी याच गुंतवणूकदारांनी पुन्हा कंपनीत राशी गुंतवून स्वत:ला अडचणीत आणून ठेवले आहे.
कंपनीने भूतकाळात अनेक योजनांचा भडिमार केल्याचेही कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. समीर जोशीने गुंतवणूकदारांची राशी ८० कोटी रुपये असल्याची सारवासारव चालविली आहे. त्याच्या दाव्यानुसार ३ हजार गुंतवणूकदारांकडून त्याने ही राशी घेतली आहे. श्री सूर्या इन्व्हस्टमेंट्स नावावर हा पैसा गोळा करण्यात आला आहे. काँग्रेस नगरातील हयात एन्क्लेव्हमध्ये श्री सूर्या कंपनीच्या मुख्यालयापुढे दहा कंपन्यांच्या नावाचा बोर्ड लागला आहे. येथून कंपनीची सूत्रे हलविली जात होती. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णु भोई यांनी गुंतवणूकदारांनी २५० कोटींची गुंतवणूक केल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. समीर जोशीने आणखी काही राज्यांमध्ये हा पैसा गुंतविल्याची माहिती असून याची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाला नागपूर पोलिसांनी पत्र पाठविल्याचे समजते. गुंतवणूक योजनेत सहभागी होणाऱ्या सदस्याला २१ हजार ३६० रुपये शुल्क द्यावे लागत होते.
यासाठी शेकडो कमिशन एजंट कंपनीने कामाला भिडविले होते. याला फसून वेकोलिच्या एका बडय़ा अधिकाऱ्याने २५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जोशी दांपत्याने वेकोलि, वनामती आणि एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढल्याचे आता स्पष्ट झाले आहे.