येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या २९ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्यस्पर्धेचे उद्घाटन या वर्षीच्या शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार विजेत्या शकुंतला नगरकर (काळे)यांचे हस्ते झाले.
अकलूज येथील स्मृतिभवनमध्ये ३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या शुभारंभासाठी राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. सिद्रामप्पा पाटील, दीपक साळुंखे, भारत भालके, दिलीप सोपला, हणमंत डोळस आदी उपस्थित होते.
मुंबईच्या प्रदीप शिंपी निर्मित ‘नटखट सुंदरी’ या पार्टीला या स्पर्धेत कला सादर करण्याचा पहिला मान मिळाला. उत्कृष्ट मुजरा झाल्यानंतर ‘कान्हा ग बाई, हळूच मारतोय खडा’ ही गौळण व त्यानंतर ‘सख्या मला सोडून जाऊ नका,’  ‘साजना जडली तुम्हावर प्रीती’ ‘तुमच्या नजरला खिनबर रोवू! माझ्या काळजाचा चुकतोय ठोका’ अशा एकापेक्षा एक सरस लावण्या व नृत्याचा आविष्कार सादर केला.
शुक्रवारी दिवसभर जिल्ह्य़ातील दुष्काळ व पाणी समस्येबाबत ज्येष्ठ नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत चिंतन केल्यानंतर पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ सिद्रामप्पा पाटील, दीपक साळुंखे, भारत भालके, दिलीप सोपल, हणमंत डोळस ही आमदार मंडळी विरंगुळ्यासाठी लावणी स्पर्धेत रमली नव्हे तर लावणी रसाने मोहोरलेल्या लक्ष्मणराव ढोबळेंनी खास लोकागृहास्तव, ‘तू येणार म्हणून मी जन्मले, तू आलास म्हणून मी सजले, ही चारोळीवजा लावणी सादर केल्यानंतर माजी मंत्री आ. दिलीप सोपल यांनी गुंतून गुंत्यात सगळा तरी पाय माझा मोकळा अशी वाहवा करीत ढोबळे यांचे आभार मानले व विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सगळे सभागृह हास्यात बुडले.