दुष्काळात छावण्यांमध्ये जनावरे दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांची उन्हाळ्यातली मशागतीची कामे खोळंबतात. त्यामुळे चारा छावणीला नव्हे तर दावणीला दिला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केले.
दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्य़ातील जनावरांसाठी शिवसेनेच्या वतीने सेलू येथून ३० हजार कडब्याच्या पेंढय़ा पाठवण्यात आल्या. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या पुढाकाराने हा कडबा संकलित करण्यात आला. दुष्काळातील पशुधन वाचवण्यासाठी ही चारा दिंडी रवाना झाली. सेलू येथे आयोजित कार्यक्रमास रावते, शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, सुधाकर खराटे आदी उपस्थित होते. जालना, उस्मानाबाद जिल्ह्य़ांत तीव्र दुष्काळ म्हणजे अजित पवारांची देणगी आहे. मराठवाडय़ाला कृष्णा खोऱ्याचे हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळाले असते तर बीड, उस्मानाबाद, आष्टी, पाटोदा या दुष्काळग्रस्त भागात आज हाल दिसले नसते, अशी टीका रावते यांनी केली. ज्या फळबागा उत्पादकांचे नुकसान झाले व ज्यांच्या फळबागा नष्ट झाल्या, त्यांना केवळ एक वर्ष अनुदान देण्यापेक्षा किमान चार वर्षे अनुदान दिले पाहिजे. नव्याने फळबागा उभारण्यास या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले पाहिजे, असेही रावते म्हणाले. लहाने, मिर्लेकर यांचीही भाषणे झाली.