मध्यप्रदेशातून आणलेल्या गावठी कट्टय़ांची नगरमध्ये खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकूण ७ पिस्तुले व ७ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. दरम्यान अटक केलेल्या चौघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश काल न्यायालयाने दिला.
शोधासाठी शाखेचे सहायक निरीक्षक भालेराव, हवालदार प्रसाद भिंगारदिवे, जोसेफ साळवे, उमेश खेडकर, अनंत सत्रे, वाघमारे यांचे पथक मध्यप्रदेशच्या वरला जिल्ह्य़ातील बालवाडी येथे जाऊन आले. परंतु गावठी कट्टे व काडतुसे पुरवणारी ही टोळी फरार झाली. सागर सोनवणे (मिरी, पाथर्डी), सागर गवळी (घोडेगाव), साहेबा गव्हाणे (सोनई) व राजू अण्णाराव सुतार (श्रीरामपूर) यांना यासंदर्भात अटक करण्यात आलेली आहे. त्यांची काल न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
राजू सुतार हा मध्यप्रदेशातून ५ ते ६ हजार रुपयांना कट्टे आणत होता, कुकाण्याजवळ सोनवणे याचा स्नेहल धाबा आहे. तेथे हा व्यवहार चालत असे. मध्यप्रदेशातून आणलेले कट्टे नगरमध्ये २५ ते ३० हजार रुपयांना विकण्यात आले. खरेदी-विक्री करताना इमामपूर घाटातील माळरानावर कट्टय़ांची चाचणी दाखवली जात असे. या टोळीने आणलेली सर्व कट्टे हस्तगत करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. गेल्या तीन महिन्यात टोळीने सात कट्टे आणल्याचे तपासात आढळले.