इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) ‘एम्स’प्रमाणे विकास करण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चाचा  आराखडा तयार करण्यात आला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत, अशी माहिती पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी रविभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आयआयटी, विधि विद्यापीठ, कर्करोग संशोधन संस्थेसाठी जमिनीची आवश्यकता असून नागरी कमाल धारणा अधिनियम १९७६अंतर्गत मंजूर भूखंड विकास योजनेतून शासनास विनामूल्य प्राप्त झालेल्या जमिनीपैकी उपलब्ध जमीन प्रस्तावित करण्यात येईल. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या क्षेत्रीय केंद्राच्या मध्यवर्ती इमारतीसाठी मागण्यात आलेली जमीन देण्यासाठी जमीन वाटप मंजुरी समितीचा प्रस्ताव शासनाकडे ४ फेब्रुवारीनंतर पाठविण्यात येईल, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.
या बैठकीत रामझुला पूल बांधकाम, शहीद स्मारक बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे बांधण्यात येणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने, अधीक्षक अभियंता व्ही.आर. बनगिनवार, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, उपजिल्हाधिकारी संगीत राव, उपविभागीय अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.