हिवतापावर नियंत्रण मिळवल्याचा दावा आरोग्य विभाग करत असतानाच नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात गेल्या दहा महिन्यात डेंग्यूचे ७१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील ४२ जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या दहा महिन्यात नागपूर विभागातील भंडारा ६४, गोंदिया ५३, चंद्रपूर ६७, गडचिरोली १२, नागपूर ग्रामीण २०२, नागपूर शहर २५८ आणि वर्धा जिल्ह्य़ात ६२ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यात भंडारा ०४, चंद्रपूर ०१, गडचिरोली ०२, गोंदिया ०२, वर्धा १८, नागपूर ग्रामीण ०८, नागपूर शहर ०७ अशा एकूण ४२ जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. खासगी रुग्णालयात डेंग्यूसाठी ‘रॅपीड’ टेस्ट केली जाते. या चाचणीत कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह निघतो. मग त्याला डेंग्यू झाला, असे खासगी रुग्णालयातील डॉक्टर जाहीर करतात. परंतु त्याचीच ‘एलायझा’ चाचणी केली असता तो रुग्ण डेंग्यूचा नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे नागपूर विभागाचे सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्यामुळे हिवताप आलेल्या रुग्णाला डेंग्यूच झाला, असा समज सध्या रूढ झाला आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सध्या जनजागृती मोठय़ा प्रमाणात झाली असल्याने हिवताप आणि डेंग्यूचे आजार कमी होत आहे. मलेरियावर औषधोपचार आहेत. डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे मलेरिया व डेंग्यू होणाऱ्या डासांची उत्पत्ती थांबवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या आठ महिन्यात ज्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले, त्यातील २१० नागरिकांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यातील १८ जणांचा मेडिकलमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मेयोमध्ये ज्या नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले होते, त्यातील ११८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मेयोमध्ये डेंग्यूने उपाचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या रक्तनमुन्याच्या चाचणीत २५८ जणांना डेंग्यू झाल्याची तर त्यातील फक्त चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग आणि उपसंचालक कार्यालयातील असलेली आकडेवारीवरून डेंग्यूच्या मृत्यूची खरी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मेडिकल आणि मेयोमध्ये डेंग्यूने मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे जात असतात. त्यामुळे या नावांची पुनरावृत्ती होत असल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात डेंग्यूनंतर मलेरिया व इतर तापाने २२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ महिन्यात दोन लाखांच्यावर नागरिकांच्या रक्तांची तपासणी करण्यात आली. त्यात ११ हजार २२८ नागरिकांना मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील मलेरियाने १५ जणांचा तर अन्य ७ जणांचा अन्य तापाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागात करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी कधी नव्हे एवढी नागरिक, आरोग्य विभाग आणि प्रशासनात डेंग्यूने दहशत निर्माण केली आहे.