राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत ऑगस्ट माहिन्यात कुष्ठरोगाचे ५५६, हत्तीरोगाचे ४०७ आणि मलेरियाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. पाण्याचे १७९ नमुने दूषित आढळून आल्यामुळे खंडविकास अधिकाऱ्यांच्यावतीने संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना नोटीस देण्यात आली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच आरोग्य समितीचे सभापती चंद्रशेखर चिखले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑगस्ट महिन्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १२ हजार रुग्णांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. प्रत्यक्षात १० हजार ३२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणी अंतर्गत ६३ रुग्णांमध्ये हत्तीरोगाचे जंतू आढळून आले.
ऑगस्ट महिन्यात २ हजार ८२१ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील १७९ गावातील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामसेवकांना खंडविकास अधिकाऱ्या मार्फत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्याच्रमाणे हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ५३ हजार २८५ पाण्याचे नमुने तपासण्यात आलेल्यापैकी ६३ नमुने दूषित आढळून आले. मलेरियाचे ‘पीव्ही’ आणि ‘पीएफ’ दोन प्रकार असतात. त्यापैकी ७ रुग्ण ‘पीएफ’चे आढळून आले. याशिवाय २३० रुग्णांवर राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्र मांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली.
साथरोगाची लागण सुरू असल्यामुळे  आरोग्य विभागाच्यावतीने विशेष लक्ष ठेवण्यात येत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी साथरोग अधिकारी ग्रामसेवक, आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे आरोग्य समितीचे सभापती चंद्रशेखर चिखले यांनी बैठकीदरम्यान सांगितले. बैठकीला समितीचे सदस्य डॉ. शिवाजी सोनसरे, जयकुमार वर्मा, शुभांगी गायधने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद गणवीर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.