ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तब्बल ७२ आंदोलक कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांनंतर पेठ वडगाव न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. पत्ता न बदलणे, महिन्यातून किमान दोन वेळा संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, अशा अनेक अटींवर जामीन मंजूर केला. सुटका होणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळंबा कारागृहासमोर मोठी गर्दी केली होती. जामीन मिळाल्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
ऊसदरावरून राज्यात सुरू असलेल्या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर १२ नोव्हेंबर, २०१२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. तावडे हॉटेल ते सांगली फाटा महामार्गावर रास्ता रोको सुरू असताना कार्यकर्ते आणि पोलिसात संघर्ष झाला. त्यानंतर आंदोलन िहसक झाले. या प्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक, भगवान काटेसह ७२ जणांना अटक करून त्यांच्यावर जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्याखाली त्यांची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीतून मुक्तता झाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्या सर्वाना कळंबा कारागृहात बंदिस्त करण्यात आले. त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात संघटनेकडून प्रयत्न सुरू होते; पुन्हा आंदोलन होईल, या कारणाखाली त्यांचा जामीन लांबला होता.
पेठ वडगाव येथील न्यायालयात संशयित आरोपींचे वकील अॅड. श्रेणीक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी युक्तिवाद मांडतांना ७२ आंदोलकांनी सर्वसामान्य जनतेला हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलन केले होते म्हणून त्यांना जामीन मिळावा, असे मत न्यायालयासमोर मांडण्यात आले. या युक्तिवादावर न्यायालयाने ७२ जणांना सशर्त जामीन मंजूर केला.
कळंबा कारागृहातून बुधवारी आंदोलकांची सुटका होणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कळंबा जेलच्या बाहेर थांबले होते; मात्र यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना न थांबण्याची ताकीद दिल्याने कार्यकर्ते पांगले. काही कार्यकर्ते ध्यानचंद हॉकी मैदानावर थांबले होते. ते त्याठिकाणी फटाके वाजवून, गुलालाची उधळण करून जल्लोष करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी पुन्हा हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पिटाळले. बुधवारी रात्री कळंबा कारागृहातून दहा-दहाच्या गटाने त्यांना सोडण्यात येत होते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७२ आंदोलकांचा जामीन मंजूर
ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तब्बल ७२ आंदोलक कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांनंतर पेठ वडगाव न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
First published on: 29-11-2012 at 08:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 72 agitators sanctioned bail