नागपूर जिल्हा परिषदेतील एकूण ७२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. २०११-१२ मध्ये तालुक्याबाहेरील प्रशासकीय बदली झालेल्या ७२ प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदलीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांनी काढले.
बदली झालेल्यांमध्ये ६४ प्राथमिक शिक्षक, दोन सर्व शिक्षा अभियानातील गट समन्वयक, दोन पदवीधर शिक्षक व चार उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशा ७२ शिक्षकांचा समावेश आहे. २०११-१२ मध्ये प्रशासकीय बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची अंतरावर तालुक्याबाहेर बदली करण्यात आली होती. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया ही संपूर्णपणे शिक्षकांच्या मानसिकतेवर अवलंबून असल्यामुळे काही संघटनांनी प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या मूळ तालुक्यात येण्यासाठी बदली करण्याचे शासनास निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने २८ ऑक्टोबर अन्वये २०११ व २०१२ मध्ये तालुक्याबाहेर प्रशासकीय बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांना आपसी बदलीसाठी पात्र धरून अशा शिक्षकांचे बदली करण्याचे निर्देश दिले होते. बदलीपात्र शिक्षकांचे ७ नोव्हेंबपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. विशेष म्हणजे आपसी बदल्यांसाठी इच्छुक असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना सेवा कालावधीची अट व टक्केवारीची मर्यादा नव्हती. प्राप्त अर्जापैकी एकूण ७२ अर्ज पात्र ठरल्याने त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. प्राथमिक शिक्षकांच्या इच्छेप्रमाणे आपसी बदल्या झाल्याने आता अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या झाल्यामुळे या निर्णयाचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांचे आभार मानले.