भारतात दरवर्षी कर्करोगाबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात असताना दरवर्षी आठ लाख नवीन रुग्णांची भर पडत असून ७० टक्के रुग्णांमध्ये रोग प्रगत अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. देशभरात तोंडाचा आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असून त्यापैकी एक तृतीयांश लोकांचे निदान रोगाच्या अंतिम टप्प्यात होत असल्याने रुग्णांचा मृत्यू होतो. ही वाढती संख्या बघता आणि दुसरीकडे देशभरात हॉस्पिटल्सची आणि डॉक्टरांची उणीव बघता त्या प्रमाणात उपचार होत नाही.
कर्करोगाबद्दल लोकांच्या मनात भीती असून त्यामुळे रुग्णाची प्रकृती अधिक खालावते. आज कर्करोगाबद्दल संशोधन होऊन अत्याधुनिक उपचार पद्धत विकसित झाली असून त्यातून रुग्ण बरा होऊ शकतो. हा कर्करोग कसा रोखता येईल, त्याचे निदान आणि मुख्यत: उपचार याविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने २०१४ मध्ये जागतिक पातळीवर ‘कलंक मिटवा आणि कर्करोगाबद्दल गैरसमज दूर करा’ या विषयावर विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मंधानिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कर्करोगांमध्ये असामान्य पेशींची जलदगतीने निर्मिती होते. ज्यात त्यांची वाढ सामान्य मर्यादेपेक्षा जास्त होत असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढते. त्यानंतर त्याचे अतिक्रमण शरिरातील भागावर होत असल्यामुळे शरिरातील कुठल्याही भागात त्याचा शिरकाव होत असल्यामुळे कोणत्याही भागाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जगात ७.६ दशलक्ष कर्करोगामुळे मृत्यू पावतात. जगभरात ही मृत्यूसंख्या वाढत असताना २०३० पर्यंत १३. १ दशलक्ष मृत्यूचे भाकित वर्तविण्यात आले आहे. भारतात ३ दशलक्ष लोक कर्करोगाने ग्रस्त आहे आणि एक दशलक्ष प्रकरणे दरवर्षी निदान केले जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०१५ पर्यंत कर्करोगाने ८ कोटी ४० लाख रुग्ण मृत्यूमुखी पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यातून मुक्त व्हायचे असल्यास त्याच्या उपचाराची आणि त्याविषयी काय काळजी घ्यावी, या संदर्भात विविध उपक्रमांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. व्यक्ती, संस्था, शासन यांनी जागृती केली, तर या असाध्य रोगामुळे अकाली मृत्यू पडणाऱ्या कर्करुग्णांच्या संख्येत २०२५ पर्यंत २५ टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. कर्करोगासाठी तंबाखू आणि दारूचे व्यसन, रोगसंसर्ग, आहार सवयी व वर्तणुकीतील घटक हे सर्वात मोठे धोकादायक घटक आहेत. ५० टक्के लोकांना तंबाखू आणि धुम्रपानामुळे कर्करोग होत असून त्यापैकी २२ टक्के लोक त्यापासून वाचू शकत नाही. पुरुषांमध्ये तंबाखू हे त्याचे मुख्य लक्षण असून तंबाखूचे अतिसेवन टाळले पाहिजे, वनस्पती आधारित अन्न, फळे, भाजी, असा आहार घेणे महत्त्वाचे आहे. चरबीयुक्त आहार आणि दारूच्या सेवनाचे प्रमाण कमी केले पाहिजे. सूर्यप्रकाशात अतिरिक्त प्रमाणात राहणे हे त्वचेचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण आहे. हेपॅटायटीस-बी विरुद्धची लस नियमितपणे टोचून घेतली पाहिजे. कारण, या संसर्गाची परिणिती यकृताच्या कर्करोगात होऊ शकते, असेही डॉ. मंधानिया म्हणाले.
काही वर्षांंपूर्वी साथीचे आजार होत होते. त्याच पद्धतीने आज कर्करोगाचे आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त  केली. ज्यावेळी कर्करोगाची सुरुवात होते तेव्हा सामान्यपणे काही लक्षणे दिसत नाही. जेव्हा रोग वाढतो त्यावेळी त्यांची लक्षणे दिसून येतात. कर्करोगाचे लवकर निदान केले गेले आणि त्यावर पुरेसे उपचार केले तर यावर मात करता येऊ शकते, असेही डॉ. मंधानिया म्हणाले. यावरील उपचारासाठी मेमोग्राफी मशिन केवळ मुंबईला शासकीय रुग्णालयात आहे. अन्यत्र कुठेच दिसून येत नाही. राज्यातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये साधने अपुरी असल्यामुळे उपचार करणे कठीण आहे.