विधानसभा निवडणुकीसंबंधी या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या १९६२ ते २००९ च्या आकडेवारीचा समावेश असलेली व अधिकारी आणि निवडणुकीची थोडक्यात माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी प्रकाशित केली असून ही पुस्तिका पत्रकार व अधिकाऱ्यांना उपयुक्त ठरणारी आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांचे हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, उपजिल्हाधिकारी निवडणूक दामोदर नान्हे व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या संबंधाने माध्यम प्रतिनिधी, निवडणुकीसंबंधी अधिकारी, तसेच अभ्यासकांना यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारीची आवश्यकता भासत असते. ही बाब डोळ्यासमोर ठेवून जिल्हा माहिती कार्यालयाने १९६२ ते २००९ या दरम्यान झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीची मतदार संघनिहाय आकडेवारी असलेली महाराष्ट्र विधानसभा जनादेश-२०१४ ही पुस्तिका तयार केली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा या मतदारसंघांच्या निकालाची आकडेवारी समाविष्ट आहे. १९६२ पासून या जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघांच्या वेळोवेळी झालेल्या बदलाची नोंद या पुस्तिकेत घेण्यात आली आहे.
१ जुलै २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित जिल्ह्य़ातील सहाही मतदारसंघातील मतदारांच्या आकडेवारीचा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१४ चा निवडणूक कार्यक्रम सुध्दा देण्यात आला आहे.
पुनर्रचनेनंतर जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघ आणि त्यांची व्याप्ती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित जिल्ह्य़ातील सर्व अधिकारी, सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक व मोबाईल क्रमांक या पुस्तिकेचे वैशिष्टय़ आहे. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त व अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व फॅक्स क्रमांक या पुस्तिकेत देण्यात आले आहे. मतदारांना आपले नाव यादीत आहे का नाही, हे तपासण्यासाठी, तसेच निवडणुकीसंबंधीची इतर माहिती उपयुक्त अशा निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळांचा सुध्दा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होत असते. आचारसंहिते दरम्यान काय करावे काय करू नये, याबाबत राजकीय पक्ष, उमेदवार, शासकीय यंत्रणा व नागरिकांना परिपूर्ण माहिती देणारे आयोगाची मार्गदर्शक तत्वे या पुस्तिकेच्या शेवटी समाविष्ट करण्यात आली आहे. ही मार्गदर्शक तत्वे वानगीदाखल असली तरी उपयुक्त अशीच आहे. ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधी व राजकीय अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी पुस्तिका प्रकाशन प्रसंगी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2014 रोजी प्रकाशित
मतदारसंघ व निवडणुकीची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित
विधानसभा निवडणुकीसंबंधी या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या १९६२ ते २००९ च्या आकडेवारीचा समावेश असलेली व अधिकारी
First published on: 23-09-2014 at 07:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A booklet published giving information of constituency and elections information