सामान्यांच्या विकासाचा जाहीरनामा आम आदमी पार्टीने रविवारी जाहीर केला. समाजातील सर्व घटकांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. ई-गव्हर्नन्सद्वारे सामान्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या, अधिक भक्कम असे जनलोकपाल विधेयक आणि स्वराज विधेयक, न्यायालय, पोलीस ठाणे, चौकशी कक्षांमध्ये सीसीटीव्ही, उमेदवाराचे वय २५ वरून २१ करणे यासह अनेक मुद्यांचा जाहीरनाम्यात समावेश असल्याचे आपचे प्रदेश प्रवक्ते रवी श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशात तीन कोटी खटले प्रलंबित आहेत. न्यायप्रक्रिया जलद गतीने व्हावी आणि प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढविण्यावर आपने भर दिला आहे. देशात थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) आपने जाहीरनाम्यातून विरोध दर्शविला आहे. उद्योग विकास दर वाढला नाही तर अशा गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती होणार नाही. कंत्राटी कामगार पद्धतीलाही आपने विरोध केला आहे. काँग्रेस आणि भाजपचे ३० ते ३५ टक्के उमेदवारांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. व्यवस्था बदलण्याची आता वेळ आली आहे. एफआयआर दाखल न करणे गुन्हा ठरायला हवा, असे श्रीवास्तव म्हणाले.
देशात ४२ हजार पेट्रोलपंप असून १५ हजार कोटी रुपयांचा पेट्रोल घोटाळा झाला आहे. सीबीआय आणि सीव्हीसी यांचे संगनमत आहे. या दोन्ही संस्था भ्रष्ट असल्याचा आरोप करून घोटाळ्याच्या स्वतंत्रपणे चौकशीची त्यांनी मागणी केली. सीएजीच्या कामावर मात्र त्यांनी समाधान व्यक्त केले. स्वतंत्र विदर्भ राज्याला आपचा पाठिंबा असल्याचे श्रीवास्तव यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर त्यांनी कडाडून टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा सांप्रदायिक तुष्टीकरण करणारा आहे, तर आम आदमी पार्टीला समाजातील सर्व घटकांचा विकास हवा आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.