दिवंगत लोकनेते यशवंराव चव्हाण यांचे विचार व त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, तरुणांनी ही प्रेरणा घ्यावी. चव्हाणसाहेबांचे विचार आत्मसात करून समाजासाठी योगदान द्यावे असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व नवमहाराष्ट्र युवा अभियान प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विविध स्पर्धाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. तर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, पंचायत समिती सभासद देवराज पाटील, विलासराव पाटील-वाठारकर, भाऊसाहेब यादव, मोहनराव डकरे यांची उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण जनतेचे अलोट प्रेम लाभलेले महान नेते होते. त्यांची जन्मशताब्दी राज्यपातळीवर विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. पी. डी. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श जोपासण्याचे काम केले.
बाळासाहेब पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना चांगला वाव मिळाला आहे. श्रीनिवास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व, निबंध तसेच चित्रकला स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मुकुंद मुंढेकर यांनी केले.