माळशिरस पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना रस्ते अपघातात मरण पावलेल्या हणमंत यशवंत आयवळे (वय ३६, रा.वरकुटे, ता. इंदापूर) याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात करण्यात आली. या मृत्यूप्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
फसवणुकीच्या गुन्हय़ात माळशिरस पोलिसांनी मृत हणमंत आयवळे यास इंदापूर येथून अटक केली होती. माळशिरस पोलीस ठाण्यात कोठडीची जागा नसल्याने आयवळे यास अकलूज पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यास न्यायालयात हजर करण्यासाठी माळशिरस येथे नेत असताना माळशिरसजवळ आयवळे याने पोलिसांच्या तावडीन निसटून पळून जाण्याच्या हेतून पोलीस जीपमधून अचानकपणे खाली उडी मारली. परंतु त्याच क्षणी मागे छोटा हत्ती वाहनाची त्यास जोरदार धडक बसली. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला.