आंबेडकरी युवकांसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांवर चर्चा आणि चिंतन होऊन त्यावर उपाय योजण्याच्या दृष्टीने नागपूरच्या बोधिसत्व फाऊंडेशनतर्फे तिसरी अखिल भारतीय आंबेडकरी युवा परिषद ५ व ६ ऑक्टोबरला सिव्हिल लाईन्स स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक राजन वाघमारे यांनी रविभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेचे उद्घाटन पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत सुधाकर गायकवाड राहतील. परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून धर्मपाल मेश्राम राहतील. या परिषदेत तीन परिसंवाद, कविसंमेलन, प्रगट मुलाखत, आंबेडकरी शाहिरी, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन, एकपात्री प्रयोग, ग्रंथांचे प्रकाशन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. परिषदेत देशभरातून दोन हजाराहून अधिक युवक सहभागी होणार असल्याची माहिती राजन वाघमारे यांनी दिली.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराने युवक जागृत होऊन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी तत्पर झाला आहे, मात्र जागतिकीकरण व खाजगीकरण हे भांडवलधार्जिणे असल्यामुळे सामान्य माणूस व युवकांचे शोषण होत आहे. आज आंबेडकरी युवकांपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यावर चर्चा व चिंतन होऊन उपाय शोधण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. रविभवनात झालेल्या या पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे अध्यक्ष राजा द्रोणकर, स्वागताध्यक्ष धर्मपाल मेश्राम, प्रेम गजभिये, अविनाश धमगाये, महेंद्र गायकवाड, नागेश सहारे, प्रा. प्रशांत दहिवले, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवते, प्रा. भीमसेन देठे, हेमराज टेंभुर्णे, दादाकांत धनविजय, प्रकाश सहारे, अरुण गाडे, माणिक निकोसे, राजकुमार वंजारी आदी उपस्थित होते.