ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स व हॉकर्स, किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटना फेडरेशनने गेल्या १ जानेवारीपासून पुकारलेल्या राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांसह हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवानाधारकांचे ‘बंद’ आंदोलन सुरूच आहे.
दरम्यान, या आंदोलनाची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने मुंबईत मंत्रालयात पुरवठा विभागाच्या सचिव पातळीवर बैठक झाली. या बैठकीत रास्त भाव धान्य दुकानदार, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवानाधारकांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या आग्रहाने मांडल्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. पुरवठा विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय व उपसचिव राजाभाऊ ठाकरे यांनी प्रलंबित मागण्या जाणून घेतल्या. या वेळी समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे पुढील आठवडय़ात पुन्हा एकदा बैठक आयोजित करून तोडगा काढण्यात येईल, असे शासनाच्यावतीने कळविण्यात आल्याचे महासंघाचे सरचिटणीस बाबूराव म्हमाणे यांनी सांगितले.
तथापि, जोपर्यंत समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्हमाणे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस महासंघाचे कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल, उपाध्यक्ष बाबूभाई शहा, अशोक येडके, संजय पाटील, गणपतराव डोळसे-पाटील, अप्पासाहेब तोडकरी, अण्णा चव्हाण व इतर पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.