अमेरिकी सिनेमाच्या खांद्याला खांदा भिडविणारी ‘बॉलीवूड’नगरी आपल्या मनोरंजन फॅक्टरीद्वारे हॉलीवूडशी बरोबरी साधण्यात कधीच मागे राहिलेली नाही. चित्रपटीय मनोरंजनासोबत आता डिस्ने किंवा युनिव्हर्सल या जगप्रसिद्ध आणि आकर्षक मनोरंजन थीमपार्कच्या तोडीचे एन्टरटेन्मेंट थीमपार्क आता पुणे-मुंबईकरांनाही अनुभवता येणार आहे. मनमोहन शेट्टी यांचे खोपोलीमध्ये उभारण्यात आलेले ‘अॅडलॅब इमॅजिका’ हे भारतातील पहिलेवहिले एंटरटेन्मेंट थीमपार्क ठरले असून ते गुरुवारपासून सुरू झाले आहे.
नवे काय?
भारतीय सिनेमा संपला, अशी ओरड सुरू असताना मनमोहन शेट्टी यांनी पहिले मल्टिप्लेक्स उभारले. आज याच मल्टिप्लेक्स संस्कृतीच्या बळावर बॉलिवूडचा उद्योग फोफावला आहे. ‘आयमॅक्स’सारख्या डोम थिएटर्सचे कौतुक इथे कोणाला, असा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. आज भारतात आयमॅक्सची डोम थिएटर उभारण्याचे श्रेयही शेट्टींच्या नावावर जमा आहे. ‘आजवर आपण पर्यटनाच्या नावाखाली आपल्या देशातला निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू विकत आलो आहोत. पण, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेगळी काहीतरी निर्मिती करण्यावर कोणीही भर दिलेला नाही. ते मी एंटरटेन्मेंट थीमपार्कच्या रूपाने करणार आहे’, असे सांगणाऱ्या मनमोहन शेट्टींची ‘अॅडलॅब इमॅजिका’ नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित जादुई नगरीचे दरवाजे सर्वासाठी खुले झाले आहेत.
असेल काय?
‘अॅडलॅब इमॅजिका’मध्ये ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटावर आधारित ४-डी तंत्रज्ञान वापरून तयार केलेली राईड लोकांचे लक्ष वेधून घेते आहे. ‘राजासॉरस पार्क’ ही थरकाप उडवणाऱ्या डायनॉसॉरशी सामना करविणारी सफर, ‘अलिबाबा आणि चाळीस चोरा’ंच्या कथेतील चाळीस चोरांना हुडकून त्यांना मारण्याचे मिशन देणारी सफर, सलीमगढच्या भुतांना न घाबरता क रायची मुशाफिरी अशा एकाच वेळी गमतीदार आणि थरारक सफरी या पार्कमध्ये पाहायला मिळतील. थीमपार्कसाठी शेट्टी यांनी डिज्नी आणि युनिव्हर्सल थीमपार्कसाठी काम केलेल्या रिनेटो फ्रॅन्सेसस्किली, पीटर स्मल्डर्स, क्रिस ब्राऊन यांची मदत घेतली. १६५० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या पार्कचा आनंद एकाच वेळी २० हजार पर्यटक घेऊ शकतात. या वर्षभरात तीन दशलक्ष लोकांनी या पार्कला भेट द्यावी, असे आपले ध्येय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ३०० एकरच्या परिसरात हे थीमपार्क वसवण्यात आले असून या पार्कसाठी पैसा जमवण्यापासून, जागा खरेदी करणे, थीमपार्कसाठी लागणारी साधने-तंत्रज्ञान याची आपल्या देशात इंडस्ट्रीच नसल्यामुळे परदेशातून तंत्रज्ञांसह अनेक गोष्टी आयात करणे, अशा अनेक अडचणींमधून वाट काढत अखेर चार वर्षांनी हे थीमपार्क उभे राहिले आहे.
डिस्नेला करून दाखवले!
थीमपार्कमध्ये पैसा खर्च करण्याची भारतीयांची ऐपतही नाही, असे डिस्नेने म्हटले होते. याच कारणास्तव डिस्नेने आपण शांघायमध्ये थीमपार्कसाठी १० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प करत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. यापैकी ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक डिस्नेकडून तर उरलेल्या ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक शांघाय राज्याकडून करण्यात येणार होती. हे वाचल्यानंतर आपली गुंतवणुकीची क्षमता काय हे दुसऱ्या देशातील लोकांनी इथे येऊन आम्हाला शिकवण्याची गरज नाही हे मनात पक्के ठरवले होते. आणि म्हणून गुंतवणुकीसाठी भांडवल गोळा करताना अनेक अडचणी आल्या, पण कोणत्याही जागतिक कंपनीची मदत आम्ही घेतली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. डिज्नीशिवायही आमच्या देशात जागतिक दर्जाचे थीमपार्क उभे राहू शकते. अॅडलॅब इमॅजिका हे माझे डिज्नीला दिलेले खरमरीत उत्तर आहे असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
बॉलिवूडच्या स्वप्नांवर उभी राहिली मनोरंजनाची बाग!
अमेरिकी सिनेमाच्या खांद्याला खांदा भिडविणारी ‘बॉलीवूड’नगरी आपल्या मनोरंजन फॅक्टरीद्वारे हॉलीवूडशी बरोबरी साधण्यात कधीच मागे राहिलेली नाही. चित्रपटीय मनोरंजनासोबत आता डिस्ने किंवा युनिव्हर्सल या जगप्रसिद्ध आणि आकर्षक मनोरंजन थीमपार्कच्या तोडीचे एन्टरटेन्मेंट थीमपार्क आता पुणे-मुंबईकरांनाही अनुभवता येणार आहे.

First published on: 20-04-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amusement park build up on the dreams of bollywood