मानवत येथे डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनेच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने परभणी व मानवत येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करीत दुकानांवर दगडफेक करून बाजारपेठ बंद पाडली. या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘चक्काजाम’चे आवाहन केले असताना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात येऊन व्यापाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकाराने व्यापारी संतप्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयावर व्यापाऱ्यांचा जमाव गेला. दगडफेकीत एक-दोन व्यापारी किरकोळ जखमी झाले. दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घ्या, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला. आमदार संजय जाधव या वेळी उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक राहुल माखणीकर यांनी शांततेचे आवाहन करीत व्यापाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करीत बसस्थानक ते रेल्वे स्टेशन व पुढे विसावा कॉर्नपर्यंत काही दुकानांवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयात व्यापाऱ्यांचा जमाव गेल्यानंतर आंदोलनकर्तेही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या वेळी मोठा तणाव निर्माण झाला. सकाळपासूनच स्थिती हाताळण्यात पोलिसांचे अपयश दिसून येत होते. रेल्वेस्थानक ते उड्डाणपुलापर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले. दुपारी दोनपर्यंत हा प्रकार सुरू होता. चक्काजाममुळे जिल्ह्य़ात दिवसभर बससेवा बंद होती, तर शहरात ऑटोरिक्षा व खासगी वाहने रस्त्यावर तुरळक प्रमाणात धावत होती.
आंदोलनामुळे सकाळी आठनंतर परभणीहून एकही बस बाहेरगावी सोडली गेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. खासगी प्रवासी वाहतूकही बंद होती. मानवत येथे काही दुकानांवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांना निवेदन देण्यात आले. भीमशक्तीचे विजय वाकोडे, युवक काँग्रेसचे राज्य सचिव सिद्धार्थ हत्तीअंबीरे, नगरसेवक आकाश लहाने, भीमा वायवळ, नागेश सोनपसारे, गौतम मुंढे, राहुल घनसावंत, शेषराव जल्हारे, सुधीर साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘चक्काजाम’ आंदोलनादरम्यान हुल्लडबाजीने परभणीत तणाव
मानवत येथे डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनेच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने परभणी व मानवत येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करीत दुकानांवर दगडफेक करून बाजा
First published on: 05-12-2012 at 02:17 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andolan of chakkajam critical situation in parabhni