विस्थापनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील दहा वर्षांत त्यात फार मोठी वाढ होणार आहे. अशा स्थितीत गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील ‘पीस’ संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल चौधरी यांनी केले.
पत्रकार जयदीप हर्डीकर यांच्या ‘यहाँ एक गाव था’ या पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. टिळक पत्रकार भवनात आयोजित समारंभाला ‘भास्कर’चे समूह संपादक प्रकाश दुबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, लेखक जयदीप हर्डीकर, अनुवादक प्रकाश हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते. चौधरी म्हणाले, स्थानांतरणाने मानव सभ्यतेचा विकास झाला. परंतु, काही लोकांच्या आग्रहामुळे आता विस्थापन वाढू लागले आहे. एकविसाव्या शतकात वाढत असलेली भांडवलशाही दुसऱ्याचा विकास बघू शकत नाही. भांडवलशाहीचे भविष्य आता उद्योगात राहिले नाही. गेल्या २० वर्षांत भांडवलशाहीने अन्न, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या चार क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्या या कंपन्या ‘टॉप टेन’मध्ये असून पुढेही राहणार आहेत. आज जमिनीसाठी खूप ओढाताण सुरू आहे. एका ठराविक मर्यादेत असलेली जमीन, हे याचे प्रमुख कारण असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
प्रकाश दुबे म्हणाले, आम्ही मूळ मुद्दय़ापासून दूर जात आहोत. जमिनीशी जोडलेल्या मुद्दय़ाशी भावना जुळलेल्या असतात. परंतु आज आम्ही विस्थापितांच्या भावनांची दखलच घेत नाही. जयदीप हर्डीकर म्हणाले, मी विस्थापितांच्या शंभर कथा लिहिल्या होत्या. त्यातील २० कथांना या पुस्तकात समाविष्ट केले आहे. सुरुवातीला २३ प्रकाशकांनी माझे पुस्तक छापण्यास नकार दिला होता. या पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केल्यानंतर ज्यांच्या समस्यांवर हे पुस्तक लिहिले, ते सुद्धा वाचन करू शकतील. विस्थापन केवळ मानवाचे होत नसून संस्कृती, त्याच्याशी जोडलेल्या भावना व परंपरेचे होत असल्याचे विलास भोंगाडे म्हणाले. शासनाने नुकताच भूमी अधिग्रहण कायद्यात बदल केला आहे. हा बदल विस्थापितांसाठी लाभदायक असल्याचेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2013 रोजी प्रकाशित
वाढत्या विस्थापनामुळे देशात गृहयुद्धाची भीती – अनिल चौधरी
विस्थापनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील दहा वर्षांत त्यात फार मोठी वाढ होणार आहे.

First published on: 22-10-2013 at 08:48 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil chaudhary words in book inaugration programme