२४ मार्च : नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, तुर्भे, या सिडको नोडमध्ये राहणाऱ्या ८० हजार माथाडी कामगारांपैकी ५० हजार मतदारांना सांभाळून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनदा मतदान करण्याचा सल्ला देण्याची जोखीम रविवारी स्वीकारली. राष्ट्रवादीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. संजीव नाईक व मुंबईतील दुसरे उमेदवार संजय दिना पाटील यांना या मतदारांचा फार मोठा आधार मानला जात आहे. मुंबईत अनेक ठिकाणी विखुरलेली घाऊक बाजारपेठ राज्य शासनाने ९०च्या दशकात नवी मुंबईत तुर्भे येथे एकाच ठिकाणी आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा, बटाटा, लसूण, भाजी, फळे, कडधान्य, मसाला यांसारखी अशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ एका छताखाली आली. त्यानंतर मुंबईतील कानाकोपऱ्यांत विखुरलेला व्यापारी नवी मुंबईत आला. त्यापाठोपाठ व्यापाऱ्यांवर रोजीरोटीसाठी अवलंबून असणारा माथाडी कामगारही नवी मुंबईचा रहिवासी झाला. एपीएमसी बाजारपेठेनंतर जेएनपीटी, लोखंड बाजार नवी मुंबईत टप्प्याटप्प्याने आल्याने माथाडी कामगारांची येथील संख्या वाढली. हा कामगार सातारा, सांगली, या पश्चिम महाराष्ट्राच्या कष्टकरी भागातील मानला जात आहे. या कामगारांचे शरद पवारांशी एक भावनिक नाते आहे. त्यामुळे ती राष्ट्रवादीची व्होट बँक मानली जात आहे. या कामगारांच्या ताकदीवरच कामगार नेते शशिकांत शिंदे तीन वेळा निवडून आले आणि आता कॅबिनेटमंत्री आहेत. त्याचबरोबर नरेंद्र पाटील यांनाही विधानपरिषद सदस्यत्व पद देऊन खूष करण्यात आले आहे. त्यामुळे हे माथाडी कामगार राष्ट्रवादी आपली हुकमी मते मानत आली आहे. पवार यांनी या कामगारांच्या घरांचा प्रश्न काही अंशी सोडवून एक आपुलकी त्यांच्या मनात तयार केली आहे. त्यामुळे माथाडय़ांचे दिवगंत नेते आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती आणि पुण्यातिथीला पवार कुटुंबापैकी एकाची हजेरी निश्चित मानली जात आहे. त्या माथाडी कामगारांना निवडणुकीच्या काळात सातारा सांगली येथे अनेक लक्झरी बसेस करून पाठवले जाते. त्यानंतर चार वर्षे मात्र हा कामगार एसटीचे धक्के खातच गावाकडे जात असल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीत गावाकडे मतदान करण्यासाठी माथाडी नेत्यांनी संपूर्ण कोपरखैरणेत खासगी बसेसची रांग लावली होती. यातील हजारो माथाडी कामगारांची दुबार मतदार नोंदणी असल्याचे पवार यांच्यासह सर्व नेत्यांना माहीत आहे. मतदार नोंदणीबरोबरच रेशनिंग कार्डदेखील दोन आहेत. त्यामुळे हे मतदार गेली अनेक वर्षे अशाच प्रकारे मतदान करीत आहेत. पवार यांच्या वक्तव्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले, असे दिसून येते. या हुकमी मतदारासाठी कायपण करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची राहिली आहे. त्यामुळेच पवार यांनी असे अपरिपक्व वक्तव्य करण्याची जोखीम घेतली. हे वक्तव्य करण्यास त्यांना ठाण्यातील एका बडय़ा नेत्याने व एका उमेदवाराने सांगितल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एप्रिल मेमध्ये गावी जाणारा मतदार हा अनेक उमेदवारांची डोकेदुखी झाला असून त्याला थोपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यातील पवार अस्त्राचा रविवारी उपयोग करण्यात
आला आहे.