कोणी हुप तर कोणी रिबन प्रकारात आपल्या शारीरिक लवचिकतेचे प्रदर्शन करण्यात मग्न..मैदानाच्या एका कोपऱ्यात सुरू असलेल्या बार वर शरीर हवे तसे तोलताना व फिरविताना खेळाडूंकडून दाखविण्यात येणारे कसब..सर्व काही अजब..जणूकाही एखाद्या कला दिग्दर्शकाने लाखो रूपये खर्च करून तयार केलेला सेटच. सर्वत्र रंगीत-संगीत लवाजमा आणि अधूनमधून एखाद्या चांगल्या कामगिरीबद्दल उपस्थितांकडून टाळ्यांच्या स्वरूपात मिळणारी दाद..
आयोजन आणि नियोजन यांच्या पातळीवर कमालीची यशस्वी झालेली स्पर्धा म्हणून नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रंगलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेचा उल्लेख करावा लागेल. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे शिवधनुष्य लिलया पेलण्यात आल्याचे दिसून आले. कुस्तीचा अपवाद वगळता नाशिककरांकडून इतर कोणत्याच खेळाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव लक्षात घेत या स्पर्धेसाठी छोटेसे परंतु आकर्षक मैदान तयार करण्यात आले होते. या मैदानाची करण्यात आलेली रचना आणि त्यामधील साहित्य, स्पर्धेच्या आयोजनाचा दर्जा ठरविण्यास पुरेसे ठरावे. महाराष्ट्रातील अत्यंत मोजक्या ठिकाणी असलेले असे साहित्य नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलामुळे या स्पर्धेसाठी प्राप्त होऊ शकले. हे संपूर्ण साहित्य २५ ते ३० लाख रूपयांच्या घरात असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी दिली. हे सर्व साहित्य विभागीय संकुलात कायमस्वरूपी राहणार असल्याने खेळाडूंना सरावासाठी उपयोग होऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले. मोरे यांच्या कार्यकाळात नाशिक येथे आतापर्यंत आयोजित सर्वच राष्ट्रीय, राज्य स्पर्धा ‘करायचं ते दणक्यात’ यानुसारच झालेल्या आहेत. स्पर्धा ही खेळाडूंसाठी असते, याची पुरेपूर जाणीव आयोजनात घेतलेली असते. त्यामुळेच स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची निवास व्यवस्था शाळा किंवा एखाद्या धर्मशाळेत न करता हॉटेलमध्ये करण्याचा पायंडा मोरे यांनी पाडला आहे. त्यास ही स्पर्धाही अपवाद ठरली नाही. अशा स्पर्धामध्ये शक्यतो विजेत्या खेळाडूंची बोळवण केवळ पदक व प्रशस्तीपत्रक देवून करण्यात येते. परंतु या स्पर्धेत एक लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम व्यक्तीगत पारितोषिकांसाठी खर्च करण्यात आली.
सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतलेली ही स्पर्धा पहिल्या दिवसापासूनच तिचे वेगळेपण मांडण्यात यशस्वी ठरली. रूचा दिवेकर, श्रावणी राऊत, क्षिप्रा जोशी या आंतरराष्ट्रीय आणि जयेंद्र पाटील, सचिन सपकाळ, ओंकार शिंदे या राष्ट्रीय खेळाडूंनी नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी स्पर्धा कशी रंगतदार होईल, याची एक झलकच सादर केली. स्पर्धा त्याप्रमाणे रंगतच गेली.
अपेक्षेप्रमाणे स्पर्धेवर मुंबई, पुण्याचे वर्चस्व राहिले तरी नाशिकच्या खेळाडूंची कामगिरीही निश्चितच चांगली झाली. नाशिकचा श्रेयस भावसार, निखील पवार, श्रेयस जाधव, कबीर मुरूगकर, ओमकार मालपुरे, ईशान खर्रा, सलोनी साखला, चैताली दांडेकर, यांनी मुंबई, पुण्याच्या तुलनेत फारशा अत्याधुनिक सुविधा नसतानाही आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. नाशिकच्या खेळाडूंना स्पर्धेआधी ठाण्याचे महेंद्र बाभूळकर, नाशिकचे प्रबोधन डोणगावकर, संदीप शिंदे, सुभाष मोरे यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास क्रीडा मंत्री पद्माकर वळवी आणि समारोपास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निश्चित कार्यक्रमाप्रमाणे उपस्थित राहाणे आवश्यक होते. परंतु या सर्वागसुंदर स्पर्धेस हे दोघेही मंत्री काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्यात क्रीडा मंत्र्यांची अनुपस्थिती अधिक खटकणारी. अशा स्पर्धाना उपस्थित राहून क्रीडा मंत्र्यांनी आयोजकांना प्रोत्साहन देण्याची गरज होती. तो एक सोपस्कार असला तरी त्यालाही एक अर्थ असतो. अर्थात खेळाडूंच्या उत्साहावर मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा कोणताच परिणाम झाला नाही. स्पर्धेच्या एकूणच दर्जेदार आयोजनामुळे त्यांना या प्रकाराची दखलही घ्यावीशी वाटली नाही. अशा प्रकारची स्पर्धा जेव्हा यशस्वी होते, तेव्हा त्यामागे अनेकांचा हातभार लागलेला असतो. जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी, प्रशिक्षक यांसह जिम्नॅस्टिक संघटनेचे पदाधिकारी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.