राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य व रिपाइं (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिचे दर्शन घेऊन अभिवादन केले. सुरुवातीला आठवले यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पक्षाचे दक्षिण-पश्चिमचे अध्यक्ष विनोद थुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, आमदार अनिल बोंडे, माजी आमदार अनिल गोंडाणे, पूर्व विभाग अध्यक्ष भीमराव बन्सोड, कांतिलाल पखिड्डे, विकास गणवीर, शहर कार्याध्यक्ष प्रतीक डंभारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यसभेत महाराष्ट्रातील समस्यांवर आवाज उठवणार असल्याचे सांगून दलितांवरील अत्याचार थांबवण्यासोबतच समाजात एकोपा वाढवण्याची गरज असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. समाजात एकोपा वाढवण्यासाठी भगवा व निळा सप्ताह सुरू करणार असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दलितांसाठी अधिक तरतूद करावी, यासाठी आग्रह करणार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी रमेश मेश्राम, शंकर मंडपे, मयुर सोनटक्के, सोनु महेशकर, अमोल वाघमारे, लंकेश मोहोड, सुधीर कडू, आकाश गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.