बाल साहित्यासह इतर विविध साहित्य पुस्तक आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध होत असले तरी दृकश्राव्य माध्यमाने अनेक लेखक आणि साहित्यक दिले आहेत. या माध्यमांचे साहित्य विश्वात मोठे योगदान आहे, मात्र या माध्यमाकडे साहित्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत असल्याची खंत अरविंद जहागिरदार यांनी व्यक्त केली.    
विदर्भ साहित्य संघ आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवनमधील महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला बालकथाकार अनंत भावे, संस्थेचे अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवींद्र फडणवीस, वामन तेलंग, आमंत्रक डॉ. रवींद्र शोभणे, मीरा चाफेकर, रेखा फडणवीस, मंगला दिघे, शंकर कऱ्हाडे उपस्थित होते. आकाशवाणीवर बालविहार या कार्यक्रमातून बाल रसिकांसमोर येणारे अरविंद मामा म्हणजे अरविंद जहागिरदार यांनी बाल रसिकांशी संवाद साधत त्यावेळेच्या बालविहारच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या काही वर्षांत लहान मुलांकडे ते लहान म्हणून दुर्लक्ष करण्याची परंपरा असून आजही ती काही प्रमाणात सुरू आहे. लहान मुलांमध्ये अनेक कलागुण असतात, मात्र ती लहान आहेत म्हणून त्याचा विचार केला जात नाही आणि ती मागे राहतात. ज्या वयात ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या त्यांना केल्या जाऊ देत नाही. त्यामुळे अनेक लहान मुले कलागुण असूनही समोर जात नाहीत.
आकाशवाणीवर सादर होणाऱ्या या कार्यक्रमाने दिनकर देशपांडे, प्रभाकर पुराणिक या सारखे बाल लेखक, कलावंत दिले आहेत. बाल साहित्यासह इतर साहित्य दृकश्राव्य या माध्यामाने समोर आणले आहे. मात्र या माध्यमांकडे दुर्लक्ष होत आहे. आकाशवाणीवर लहान मुलांसाठी सादर होणारा बालविहार हा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. बालविहार म्हणजे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होते. मुलांना घडविण्यासाठी बाल साहित्य निर्माण केले जात असले तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अनेक बालगीत आकाशवाणीवर सादर होत असे, मात्र ती बालगीते ऐकायला मिळत नाही. मुलांपर्यंत साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. चांगली पुस्तके त्यांना घेऊन दिली जात नाहीत. आज मुले काही बोलायला लागली किंवा करायला लागली की चूप केले जाते. ही संस्कृती बंद झाली पाहिजे. मुलांच्या मनाचा विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट मुलगा मागत असेल तर त्याच्या मागे काही तरी कारण असेल त्यामुळे पालकांनी त्या दृष्टीने विचार करावा, असे आवाहन जहागिरदार यांनी केले.
या कार्यक्रमात बालकथा लेखक मंगला दिघे आणि शंकर कऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा फडणवीस यांनी केले. शिक्षणाचा आमचा हक्क आहे, आम्ही तो बजवणार आहो’ या सामूहिक गीताने दोन दिवसीय बालसाहित्य संमेलनाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे संचालन उर्वशी डवरे यांनी केले. शुभदा फडणवीस यांनी आभार मानले.  
संमेलनात पाच ठराव संमत : या संमेलनात पाच ठराव संमत करण्यात आले असून त्याचे वाचन स्वागताध्यक्ष रवींद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासनाने मराठी माध्यमांच्या शाऴांचे अनुदान बंद करून मराठी भाषेवर व मराठी भाषकांवर कुठाराघात केला आहे. अनुदान त्वरित सुरू करण्यात यावे, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे अन्य साहित्य संमेलनाप्रमाणेच जिल्हा पातळीवर बाल महोत्सवाचे आयोजन करावे आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद शासनाने करावी, बालकांची साहित्य निर्मिती असलेल्या किशोर मासिकाचे शासनाने पुनरुज्जीवन करावे, द्रुक श्राव्य माध्यमात एकही दूरचित्रवाणी उपलब्ध नाही, त्यामुळे मराठी बाल वाहिनी सुरू करावी व शासनाने पुढाकार घ्यावा, एकेकाळी आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणारा बालविहार कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करावा, असे ठराव यावेळी करण्यात आले. या ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. हे सर्व ठराव राज्य शासनाकडे आणि सासवडमध्ये होणाऱ्या संमेलनात संमेलनाध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याचे रवींद्र फडणवीस यांनी सांगितले.
संमेलनाध्यक्षांची अनुपस्थिती
राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विजया वाड यांची निवड केल्यानंतर गेल्या दोन दिवस त्या संमेलनातील सर्वच कार्यक्रमांना पूर्ण वेळ उपस्थित असताना त्यांनी समारोपाला उपस्थित राहणे आवश्यक होते, मात्र संमेलनाच्या समारोपापूर्वी त्या दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्यापूरला गेल्या. प्रत्येक साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षाच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होत असून त्यांच्या उपस्थितीत ठराव केले जात असतात. डॉ. विजया वाड यांची अनुपस्थिती सर्वाना खटकणारी होती आणि तशी चर्चा परिसरात होती.