अमरावतीच्या ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनचा कार्यकर्ता पुरस्कार यंदा मराठवाडय़ातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व लेखक अमर हबीब यांना जाहीर झाला आहे. येत्या २० ऑक्टोबरला अमरावतीत आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एक लाख रुपये रोख व स्मृती चिन्ह असे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर संकुलात २० तारखेला दुपारी चार वाजता आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रसिंह राणा, आमदार बच्चू कडू, शेतकरी आंदोलक चंद्रकांत वानखडे, विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड प्रामुख्याने उपस्थित राहतील. अमर हबीब यांनी  डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या प्रभावातून राष्ट्रसेवा दलाच्या संपर्कात आलेल्या अमर हबीब यांची शालेय व महाविद्यालयीन जीवनातच बंडखोर कार्यकर्ता अशी ओळख झाली. गुजरातमधील विद्यार्थ्यांनी १९७४ मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनामुळे प्रेरित होऊन मराठवाडय़ात सुरू झालेल्या आंदोलनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आणीबाणीमध्ये ते १९ महिने तुरुंगात होते. छात्र युवा संघर्ष वाहिनेचे ते राज्य व राष्ट्रीय संयोजक होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, शेतकरी आंदोलनातही ते सक्रिय होते. दै. मराठवाडाचे ते संपादक होते. त्यांची आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.