राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पाच सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात आले. गुरुनानक भवनात सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी कानपूरचे माजी संचालक संजय धांडे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ राहतील. आदर्श शिक्षक म्हणून राजकुमार केवलरामानी महाविद्यालयाच्या डॉ. उर्मिला डबीर, यशोदा गर्ल्स आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाचे डॉ. एम.ए. हयात, नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभागातील डॉ. एन. डब्लू. खोब्रागडे यांना गौरविण्यात येईल.
शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशलवर्कच्या डॉ. नंदा पांगूळ यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. उत्कृष्ट संशोधकाचा मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर औषधविज्ञानशास्त्र शास्त्र विभागातील डॉ. एस.एन. उमाठे यांना मिळाला आहे. चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील डॉ. एस.बी. किशोर यांना उत्कृष्ट लेखक म्हणून गौरविण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रांमध्ये उपस्थित राहणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षकांना शिक्षक कल्याण निधी अंतर्गत १५ हजार रुपयांची आर्थिक सहाय्यता  देण्याची योजना यावर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच मृत शिक्षकांच्या वारसदारांना आर्थिक सहाय्यता म्हणून याच निधीतून ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.