पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घुटमळणाऱ्या चोरटय़ांकडून महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार घडत असताना आता संबंधितांकडून दाखविल्या जाणाऱ्या अमिषालाही महिला अगदी सहजपणे भुलत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. ५०० रुपयांची बक्षिसी आणि साडी मिळण्याचे चोरटय़ाने दाखविलेले अमिष एका महिलेला चांगलेच महागात पडले. म्हणजे, तिचे ८० हजाराचे दागिने घेऊन चोरटय़ाने पळ काढला.
महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून शहरात अव्याहतपणे सुरू आहे. त्यात रस्त्यावरील पायी चालणाऱ्या महिलांना अमिष दाखवून लुटण्याचे प्रकार अधुनमधून घडतात. चोरटय़ांच्या अमिषाला महिला किती सहजपणे भुलतात याचे उदाहरण म्हणून पंचवटीतील घटनेकडे पहाता येईल. दहीपुलाजवळील नगरकर लेनमध्ये वास्तव्यास असलेल्या किरण नरेंद्र दाते या मंगळवारी सकाळी दहा वाजता पंचवटीतील पार्थ हॉटेलच्या परिसरातून मार्गस्थ होत असताना ही घटना घडली. चोरटय़ाने त्यांना ‘एका श्रीमंत माणसाला मुलगा झाला असून तो महिलांना साडी व ५०० रुपये वाटत असल्याची’ बतावणी केली. पार्थ हॉटेलच्या पायऱ्यांवर दाते यांना बसवून चोरटय़ाने त्यांच्या जवळील दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. यावेळी दागिने लंपास करून चोरटा पसार झाला. बराच वेळ झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दाते यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठले. ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व मोहन माळ चोरटय़ाने लंपास केल्याची तक्रार त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, वेगवेगळी अमिषे दाखवून चोरटे महिलांना गंडा घालत असतात. या घटनेत चोरटय़ाने तेच तंत्र वापरले.
५०० रुपयांची बक्षिसी आणि साडी याला भुललेल्या दाते यांच्यावर स्वत:चे किंमती दागिने गमाविण्याची वेळ आली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
साडीचे आमिष, ५०० रुपयांची भुरळ अन् ८० हजार रुपयांवर पाणी
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घुटमळणाऱ्या चोरटय़ांकडून महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार घडत असताना आता संबंधितांकडून
First published on: 16-01-2014 at 11:25 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bait of sari makes her lose 80 thousand rupees