नवी दिल्लीत तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक ठिकाणी विविध विचारमंथन सुरू आहे. परंतु सोलापुरात पोलीस आयुक्तालयाने यासंदर्भात घेतलेल्या महाविद्यालयाच्या प्राचायार्ंच्या बैठकीत महाविद्यालयाच्या परिसरात मुलींना स्कार्फ व मोबाइल वापरण्यास बंदी घालण्याची आश्चर्यकारक सूचना मांडली गेली. ही सूचना म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेपेक्षा उलट, त्यांच्यावर प्रतिगामी विचारांच्या जोखडात बांधून ठेवण्यासारखी आहे. किंबहुना पुरोगामी विचारांना तिलांजली देऊन खाप पंचायतींसारख्या मध्ययुगीन विचारांचे एका प्रकारे समर्थन करणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शहर पोलीस आयुक्तालयात महाविद्यालय, शाळा, आयटीआय, वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालये प्रमुखांची बैठक पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी घेतली. या बैठकीत महिला तथा विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी चर्चा घडविण्यात आली. शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थिनी व एकूणच महिलांसाठी सध्याच्या काळात निर्भयतेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच पुरूष मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकांनीदेखील सहभागी होणे गरजेजे असल्याचे मत पोलीस आयुक्त रासकर यांनी सुरूवातीला मांडली. या वेळी विविध शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यानी सुरक्षेच्यादृष्टीने मुलींना येणाऱ्या अडचणी कथन केल्या. याचवेळी महाविद्यालय परिसरात स्कार्फ आणि मोबाइल वापरण्यास मुलींना बंदी घालावी, तसेच ड्रेसकोडसाठी पुनर्विचार व्हावा, असे मत संभाजीराव शिंदे बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नसीमा पठाण यांनी व्यक्त केले. त्याबाबतची माहिती पोलीस आयुक्तालयाच्यावतीने प्रसिध्दीला देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार नवीन नाहीत. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात व बाहेर रस्त्यावर टपोरीगिरी करणारी मुले दिसतात. त्यांच्याकडून मुलींची छेडछाड केली जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व महाविद्यालय परिसरात व बाहेर रस्त्यावर नागरी गणवेशातील पोलीस पथके ठेवावीत, त्याठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, शाळा व महाविद्यालयांमध्ये पोलीस ठाणे व पोलीस अधिकाऱ्यांचे दूरध्वनी तथा भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून मुलींना लागलीच पोलिसांशी संपर्क साधून मदत घेता येईल, असे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. बावधनकर यांनी मांडले. परंतु त्याचवेळी महाविद्यालय परिसरात मुलींना स्कार्फ व मोबाइल वापरण्यास बंदी असावी, अशी सूचना दस्तुरखुद्द एका महिला प्राचार्याकडूनच मांडली गेल्याने हा वादाचा विषय ठरला आहे.
निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया
स्कार्फ व मोबाइलवर बंदी घालण्याची सूचना आणि मुस्लिम स्त्रियांनी बुरखा घालण्याची सक्ती करणे व चित्रपटगृहास जाण्यासाठी बंदी घालण्याची सूचना, हे दोन्ही प्रतिग्रामी विचाराचे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रासह विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात व्यक्त होत आहे. आज स्कार्फ व मोबाइल वापरू देण्यास बंदी घालण्याचा विचार पुढे येत आहे, तर उद्या महाविद्यालयातील स्नेहसंमेलन तथा गुणदर्शनाच्या कार्यक्रमात मुलींनी सहभागी होऊ नये, महिलांनी रात्री बाहेर फिरू नये, असाही आग्रह होईल. मग त्याचा विचार होणार काय, असा सवाल प्राचार्य सीताराम गोसावी यांनी उपस्थित केला. स्त्री-पुरूष समानतेचा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर लहानपणीच रुजविला पाहिजे. सगळा दोष मुलींनाच देता कामा नये, असे मत त्यांनी मांडले.
ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांनी महाविद्यालयाच्या परिसरात मुलींना मोबाइल, स्कार्फ  वापरण्यास बंदी करण्याची सूचना पुरोगामी नव्हे तर प्रतिगामीपणाचे लक्षण असल्याचे मत व्यक्त केले. खरे तर आता महिलांच्या बाबतीत पुरूषांनीच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. महाविद्यालयात मुलांचे वर्तन नैतिकतेचे असावे. मुलींची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तीन ते पाच वर्षांसाठी अशा टपोरी विद्यार्थ्यांना ‘रस्टिगेट’करता येणे शक्य आहे. त्यासाठी पुढाकार घेतला गेल्यास मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सतावणार नाही, अशी सूचना अॅड. माने यांनी मांडली.
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. वर्षां देशपांडे यांनी, प्राचार्या नसीमा पठाण यांची सूचना चुकीची व घटनाबाह्य़ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलींनी महाविद्यालयात मोबाइल किंवा स्कार्फ वापरू नये, त्यांनी सातच्या आत घरात यावे, रात्री घराबाहेर फिरू नये, अशी बंधने घालणे म्हणजे सारा दोष मुलींना देण्यासारखे आहे. स्त्री-पुरूषांना घटनेने समान दर्जा दिला आहे. मात्र महिलांवर बंधने घालणे म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे. त्यापेक्षा पुरूषांनी आपली मानसिकता बदलायला हवी. सार्वजनिक जीवनात महिलांचा वावर कमी झाला तर महिलांच्या सुरक्षेची परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीतीही अॅड. देशपांडे यांनी व्यक्त केली. महिलांनी पूर्ण कपडे घालण्याने, मोबाइल किंवा स्कार्फ न वापरण्याने महिलांवरील अत्याचार कमी होतील, असे म्हणता येणार नाही. सावित्रीबाई फुले यांच्या काळात महिलांच्या बाबतीत अशीच बंधने होती. त्यात  बदल झाला नसता तर नसीमा पठाण प्राचार्या झाल्या असत्या काय, असा सवालही अॅड. देशपांडे यांनी उपस्थित केला.