कांद्यांच्या वाढत्या किंमतींमुळे शहरी भागातील नागरिकांना रडकुंडीस आणले असून या वाढत्या दराचा लाभ शेतकऱ्यांना फारसा न होता साठेबाजी करणाऱ्यांना होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत असताना धुळे शहरात या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनचे औचित्य साधून वेगळीच शक्कल लढविली.
धुळे भाजप महिला आघाडी आणि जायंटस् ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महिलांनी राखी बांधल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना भेट स्वरूपात रोख रक्कम किंवा इतर वस्तू न देता कांदा दिला. सध्या महागाईमुळे दिसेनासा झालेल्या कांद्याची भेट पाहून महिलावर्गही हरखून गेला. किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढल्याने त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधीच महागाईने पोळून निघालेल्या जनतेमध्ये त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे प्रत्यंतर या कार्यक्रमातही दिसून आले. जिल्हा भाजप अध्यक्ष सुनील नेरकर यांनी कांद्याच्या वाढलेल्या किंमतींना थेट सरकारला जबाबदार धरले.            
कांद्याच्या वाढत्या किंमतींमुळे शेतकऱ्यांचा नव्हे तर दलाल व साठेबाजांचा आर्थिक फायदा होत आहे. किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने नफेखोरांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा भाजप कार्यकर्ते जिल्ह्य़ात तीव्र आंदोलन करतील असा इशारा नेरकर यांनी दिला.
कोणतेही संयुक्तीक कारण नसताना अचानक कांदा, ऊस, कापूस यांसारख्या शेतमाल भावांच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. त्यासाठी नेरकर यांनी राजकीय मंडळींना जबाबदार धरले आहे. वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ठराविक नफेखोरांच्या माध्यमातून पक्षनिधी संकलित करण्याचा तो एक कुटील डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी अशा प्रवृत्तीला धडा शिकवायचा असेल तर दलालांना कांदा न विकता थेट बाजारात ग्राहकांना विकावा असे आवाहनही नेरकर यांनी केले. यावेळी महापौर मंजुषा गावित, महानगर प्रमुख हिरामण गवळी, डॉ. महेश घुबरी, बापू खलाणे आदी उपस्थित होते.