लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून होणारा वारेमाप खर्च बघता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी कुठल्याही बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी पंजाबराव वानखडे यांनी सांगितले, निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या कारणावर खर्च होत असला तरी त्याची अनेकदा कुठे नोंद होत नाही. या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाच्या दृष्टीने कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक, टपाल खाते आदी ठिकाणी स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. ज्या दिवशी उमेदवार नामांकन अर्ज भरेल त्याच्यापूर्वी त्यांनी खाते उघडणे आवश्यक आहे. त्या खात्याचा क्रमांक आणि बँकेचा नामांकन पत्रामध्ये उल्लेख करावा लागेल. या खात्याच्या माध्यमातून उमेदवाराला खर्च करावा लागणार असून  देणी धनादेशाद्वारे करावे लागणार आहे. दर आठ दिवसांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधीत उमेदवारांचा खर्चाचा तपशील बँकेकडून घेण्यात येईल आणि नोंद त्यांच्याकडे राहील. यावर्षीपासून आयोगाने हा नियम लागू केला आहे. उमेदवाराने नामांकन अर्ज भरताना बँक खात्याचा क्रमांक देणे आवश्यक आहे. नाही दिला तर नियमांचा भंग केला म्हणून त्यांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो आणि संबंधी उमेदवार अपात्र ठरू ठरेल. या निर्णयामुळे उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण राहणार असून कुठल्या उमेदवाराने किती खर्च केला याची नोंद राहणार आहे. यासंदर्भात सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना जर निवडणुकीच्या काळात खर्च करायचे असेल तर ते देताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी बँकेने घ्यायावयाची आहे. बँकेला त्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे. यावर्षीपासून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून
त्या आदेशाचे उमेदवारांना पालन करावे
लागणार आहे, असेही वानखडे यांनी सांगितले.