अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ‘भूत आया’ या दूरचित्रवाणीवरील मालिकेच्या विरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सोनी चॅनलवर ‘भूत आया’ ही मालिका सुरु करण्यात आली आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन समितीने गणेशपेठ पोलीस ठाण्यात चॅनलविरुद्ध ही तक्रार केली आहे. भूत आया ही मालिका अंधश्रद्धेचा प्रचार करणारी आहे. त्यात सत्य घटनांवर आधारित म्हणून प्रचार करण्यात येत आहे. भूत, मंत्रतंत्र, जादूटोणा या अस्तित्वहीन बाबी आहेत. भूत, पिशाच्च्यांना आवाहन करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणे, मृत्यूची भीती दाखवणे, भुताटकीच्या नावे मारहाण करणे हा गुन्हा मानला गेला आहे.
दूरचित्रवाणींच्या माध्यमातून प्रचार करणे हा देखील गुन्हा आहे. तरीही वाहिनीवर अशा अस्तित्वहीन गोष्टींच्या विरोधात मालिका दाखवली जात असून समाजासाठी ते घातक आहे. म्हणूनच चॅनलच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष उमेश चौबे, सरचिटणीस हरीश देशमुख यांनी गणेशपेठ पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांच्याशी भेट घेऊन तक्रार केली आहे तसेच या प्रकरणी चौकशीची मागणी केली. अंधश्रद्धेला खतपाणी देणारी मालिका ताबडतोब बंद करावी, अशी मागणी समितीचे उत्तम सुळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.