नववर्षाचे स्वागत करीत असताना मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी इचलकरंजीत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वाना न्यायालयासमोर उभे केले असता प्रत्येकी १ हजार रूपयांचा दंड प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावला. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नारायण चित्रमंदिर परिसरात तरूणांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस अधीक्षक चैतन्य एस., पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांनी पोलीस फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी याप्रकरणी शीतल स्वराज्य केर्ले (वय २१),त्याचा भाऊ सुशांत (२१), गणेश प्रमोद केर्ले (२१), अक्षय गजानन कचरे (१९), राजेंद्र किसन केर्ले(४४), अविनाश बाळासाहेब जाधव (२४), संतोष जाधव (२२), आशिष सुनील जाधव (२३) त्याचा भाऊ अमर (२१), अमित बापू देसाई (२२ रा.सर्व मंगळवार) या दहा जणांना पोलिसांनी अटक केली. चैतन्य एस. यांनी आरोपींना चांगलाच पोलिसी खाक्या दाखविल्याची चर्चा आहे.
सशस्त्र हल्ल्यात पिता-पुत्र जखमी
ध्वनियंत्रणा लावल्याच्या कारणावरून चौघा तरूणांनी केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी झाल्याची घटना इचलकरंजी येथे घडली. याबाबत बाळू लहू कांबळे (वय ४५) यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी शब्बीर रामचंद्र जाधव, संतोष जाधव, सोन्या कांबळे व दिनेश वायदंडे या चौघांनाअटक केली आहे. साईट नं.१०२ मध्ये बाळू कांबळे यांच्या घरासमोर नववर्षांच्या स्वागतासाठी ध्वनियंत्रणा लावली होती. स्पीकर लावण्याच्या कारणावरून बाळू कांबळे यांचा मुलगा गणेश कांबळे आणि आरोपींमध्ये वादावादी झाली. हा वाद सोडविण्यासाठी बाळू कांबळे तेथे आले असता आरोपींनी कांबळे पिता-पुत्राला काठी, चाकू, कमरेचा कट्टा व बिअरच्या बाटल्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये पिता-पुत्र जखमी झाले.त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चौघा आरोपींना आज न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.