मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा दर दिवशी दिरंगाईने धावण्यासाठी प्रसिद्ध असली, तरी त्यासाठी केवळ तांत्रिक बिघाड हे एकमेव कारण नसून या मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकांचाही त्याला हातभार लागतो. गेल्या काही वर्षांत रेल्वे फाटकांमधून रूळ ओलांडणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम फाटक उघड-बंद होण्यावरही झाला आहे. परिणामी या रेल्वे फाटकांचा फटका रेल्वेच्या लोकल सेवेला बसतो. त्यामुळे ही फाटके कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे. या फाटकांमुळे दर दिवशी साधारणपणे ३० लोकल गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होते.
पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गावर प्रवाशांना वाहनांसह ये-जा करण्यासाठी फाटके आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवरील बहुतांश फाटके बंद करण्यात आली आहेत. मात्र मध्य रेल्वेवर कळवा, दिवा, ठाकुर्ली आणि हार्बर मार्गावर चुनाभट्टी व शिवडी या स्थानकांजवळील फाटके अजूनही कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत या फाटकांमधून रहदारी करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना फाटकांजवळ वाहनांची गर्दी जमलेली असते. ऐन गर्दीच्या वेळी वाहनांची ये-जा चालू असल्यास लोकल गाडय़ांना फाटकाआधी सिग्नल देऊन थांबवले जाते.
फाटक उघडण्यास व बंद होण्यास किमान चार मिनिटांचा अवधी लागतो. मात्र वाहनांची संख्या लक्षात घेता एकदा फाटक उघडल्यानंतर वाहनांची गर्दी होते आणि वाहतूक कोंडी होते. अशा स्थितीत ही वेळ सहा ते सात मिनिटे होते. त्यामुळे लोकल रखडतात. एक गाडी रखडल्यास त्या मागच्या गाडय़ाही रखडून वेळापत्रकावर परिणाम होतो.
दिवा स्थानक संवेदनशील
फाटकांमधील वाहतूक कोंडीबाबत दिवा स्थानक संवेदनशील मानण्यात येते. दिवा येथील खासगी वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत खूपच वाढली आहे. या स्थानकातील फाटकाच्या दोन्ही बाजूला रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात केले जातात. त्यामुळे वाहनांची गर्दी आवरणे शक्य होते. अन्यथा परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, असे रेल्वेतील काही अधिकारी सांगतात.
पूल हाच पर्याय
मध्य रेल्वेवरील विक्रोळी, बदलापूर यांसह इतर काही स्थानकांजवळ पूल बांधल्यानंतर तेथील फाटके बंद करण्यात आली. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक काही प्रमाणात सुधारले आहे. याआधी तब्बल ६० गाडय़ांचे वेळापत्रक बिघडत असे. आता ही संख्या ३० वर आली आहे. उर्वरित रेल्वे फाटकांची समस्या सोडवण्यासाठी तेथे पर्यायी वाहतूक किंवा पूल बांधण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने रेल्वेने राज्य सरकारला सूचना केली असून त्याबाबतचा पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.