शांत व सुरक्षित म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता महिलांसाठी असुरक्षित होऊ लागले आहे. शहरात दर दोन दिवसांनी सोनसाखळी चोरीच्या किमान तीन घटना घडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पुण्यात अशा घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्य़ांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. या वर्षी नोव्हेंबरअखेर पुण्यात अशा तब्बल ४४३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
शहरात वेगवेगळ्या ‘क्लृप्त्या’ वापरून फसविणे, पोलीस असल्याची बतावणी करून लुटणे अशा अनेक घटना घडत आहेत. मात्र पुणे पोलिसांपुढे सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहेत ते सोनसाखळी चोर! दुचाकीवरून भरधाव येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाढ चालली आहे. सोन्याचे दरवाढ झाल्याने दिवसेंदिवस सोन्याची ‘झळाळी’ वाढत असल्याने इतर छोटय़ा गुन्ह्य़ातील चोरटय़ांनी आता आपले लक्ष सोन्याच्या चोरीवर केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. २०१० मध्ये वर्षभरात २३१ सोनसाखळी चोरीच्या घटना होत्या.  त्यामधील फक्त ७८ घटना उघडकीस आणण्यात त्यांना यश आले आहे. २०११ मध्ये २९८ घटना घडल्या होत्या. त्यामधील एकशे चाळीस  घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०१२ मध्ये नोव्हेंबपर्यंत ४४३ घटना घडल्या आहेत. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, या घटना थांबवण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
सोनसाखळी चोरीच्या घटना व गुन्हेगारांची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अभ्यासामध्ये घरफोडी, इतर छोटय़ा-मोठय़ा चोऱ्या करणारे गुन्हेगार सध्या सोनसाखळीच्या गुन्हयाकडे वळले आहेत. त्याचबरोबर एका जिल्ह्य़ातील गुन्हेगार दुसऱ्या जिल्ह्य़ात जाऊन या चोऱ्या करत असल्याचे आढळून आले आहे.  या चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमागे सोन्याचा वाढलेला भाव हे सुद्धा एक कारण असल्याचे दिसून आले आहे. सोनसाखळी चोरांकडून मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ महिलांना लक्ष केले जात आहे. सोनसाखळी चोरांवर वचक बसावा म्हणून पोलिसांनी यावर्षी पहिल्यांदा सोनसाखळी चोरांवर  ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा’ (मोक्का) लावला आहे. तरीही सोनसाखळी चोरीच्या घटना कमी होण्यास तयार नाहीत. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांनी सांगितले, शहरात पेट्रोलिंग वाढविले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार शोधण्याचे काम सतत सुरू आहे.     
चोवीस तासांत तीन सोनखळी चोरीच्या घटना
शहरात गेल्या चोवीस तासात निगडी व चिंचवड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सव्वा चार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. विजया लक्ष्मण चौधरी या चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व नेकलेस हिसकावून नेले. तर चिंचवड येथील श्रीधरनगर येथे माधुरी कमलाकर कुलकर्णी यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले.