मनसेच्या वतीने महाराष्ट्र व कामगार दिनाच्या पाश्र्वभूमीवर येथील डोंगरे वसतिगृह मैदानात एक ते नऊ मे या कालावधीत आयोजित स्वस्त धान्य महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी आ. वसंत गीते, महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून आ. नितीन भोसले, अतुल चांडक, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे आदी उपस्थित होते. धान्य महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील १५ ते २० प्रकारचा गहू, तांदुळ, डाळी, ज्वारी, बाजरी, नागरी, जवस, मठ, मूग, फळे, भाजीपाला अत्यंत स्वस्त दराने ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. २१८९, बन्सी, काली मूछ असे गव्हाचे तर इंद्रायणी, बासमती असे तांदळाचे प्रकार या महोत्सवात आहेत. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याने तसेच शेतकऱ्यांकडील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्याने तो ग्राहकांसाठी उपयुक्त असल्याचे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एक क्विंटलपेक्षा अधिक धान्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरात त्यांचे घर असेल तर माल मनसेच्या वतीने घरपोच करण्यात येत आहे.