महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी मराठी बांधवांनी नव्याने प्रयत्न चालू ठेवले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाला चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत नवी दिल्ली येथे जाऊन सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील खटल्याचे कामकाज बघणाऱ्या वकिलांना महाराष्ट्राची बाजू अधिक मजबुतीने मांडण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले.    
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या दाव्याचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. ४ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सुनावणीवेळी महाराष्ट्राची बाजू प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे. याचे महत्त्व महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री व राजकीय नेत्यांना समजावे यासाठी मराठी भाषिकांनी त्यांची भेट घेण्याचे सत्र सुरू केले आहे. यातूनच अजित पवार, आर.आर.पाटील व जयंत पाटील या तीन प्रमुख नेत्यांची भेट घेण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहराचे सचिव दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, राजू मर्वे, गोपाळ हांडे व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले. तिन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून या लढय़ात मराठी भाषिकांना कसलीही उणीव राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले.