दप्तरांच्या ओझ्यामुळे सुमारे ३० टक्के मुलांमध्ये पाठदुखीची तक्रार उद्भवण्यासोबतच, नेहमीसाठी पाठीचा कणा दुखावण्याचा धक्कादायक निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. दफ्तरांचे हे ओझे घेऊन शाळेत दोन-तीन मजले चढणे आणि अपार्टमेंटमध्ये राहात असल्यास त्या ठिकाणीसुद्धा तेवढेच ओझे घेऊन चढण्याची कसरत दररोज विद्यार्थ्यांना करावी लागते. त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झाला आहे. बल्लारपूर येथील गुरुनानक कॉलेज ऑफ सायन्सचे सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक राजेंद्र दाणी यांनी यावर उपाय शोधला असून, केंद्राच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे.
चिल्ड्रेन स्कूल बॅग अॅक्ट २००६ नुसार दफ्तरांचे ओझे हे मुलांच्या वजनाच्या १० टक्के इतके असायला हवे. मात्र, दफ्तरांचे ओझे हे २० टक्क्यांपर्यंत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्याच्या सर्व शाळांमध्ये परिस्थिती सारखीच आहे. दफ्तरांच्या ओझ्य़ामुळे स्नायू, लिगामेंट्स आणि डिस्क दुखावण्याचा धोका असल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासातील निष्कर्ष आहे. मान, पाठ दुखणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, खांद्याचे दुखणे हे तात्काळ होणारे अपाय असून, मान आणि खांदे नेहमीसाठी दुखावले जाऊ शकतात. आत्मविश्वास कमी होणे आणि नैराश्य येण्यासारखे मानसिक आजारसुद्धा मुलांमध्ये कमी वयात उद्भवू शकतात. खांद्यावरील दफ्तरापेक्षा पाठीवरचे दफ्तर अधिक सुविधाजनक आहे. बहुतांश मुले ते खांद्यावरच घेत असल्यामुळे आणि पाठीवर घेतले तरी ते कमरेच्या खाली जात असल्यामुळे खांदा दुखावण्याचा धोका आहे. दररोज आठ ते नऊ विषयांचे वर्ग करणाऱ्या विद्यार्थ्यांंसोबत तेवढय़ाच विषयांची पुस्तके आणि वह्या सोबत असतात. तर कित्येक विद्यार्थी हे वेळापत्रकाप्रमाणे पुस्तके आणि वह्या दफ्तरात ठेवत नाही, त्यामुळे दफ्तराचे ओझे वाढण्यासाठी ते सुद्धा कारणीभूत आहेत. पालक आणि शिक्षकांनी याकडे लक्ष दिल्यास समस्या बऱ्यापैकी सुटू शकते.
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार पहिली आणि दुसरीकरिता दफ्तराचे ओझे दोन किलोपेक्षा अधिक नको. तिसरी आणि चौथीकरिता तीन किलो, पाचवी ते आठवीकरिता चार किलो आणि नववी ते बारावीकरिता सहा किलोपेक्षा अधिक दफ्तराचे ओझे नको. पुस्तके आणि वह्यांमुळेच दफ्तराचे वजन वाढत आहे. त्यातील पुस्तकांचे ओझे २५ टक्क्याने आणि वह्यांचे ओझे ५० टक्क्यांनी कमी करता येऊ शकते. केंद्र आणि राज्याच्या शाळांमध्ये वर्षांतून चार चाचणी परीक्षा होतात. त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम चार भागात विभाजित करून, इयत्ता पहिली ते दहाव्या वर्गापर्यंतची पुस्तके स्पायरल बाईंडिंगच्या स्वरूपात केली तरीसुद्धा पुस्तकाचे वजन कमी करता येऊ शकते. २०० पानांच्या वहीऐवजी १०० पानांच्या वह्यासुद्धा वापरल्या जाऊ शकतात. देशातील सुमारे १६ लाख शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळेतच लॉकर पुरवल्यास त्या ठिकाणी त्यांची पुस्तके राहू शकतात. या उपायांचा अवलंब केल्यास ३.५ किलोचे पुस्तकाचे ओझे ८७५ ग्रॅमवर आणता येईल आणि २.२ किलोचे वह्यांचे ओझे १.१ किलोवर आणता येईल, असा दावा राजेंद्र दाणी यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2014 रोजी प्रकाशित
दप्तरांच्या ओझ्य़ामुळे ३० टक्के मुलांना पाठदुखी
दप्तरांच्या ओझ्यामुळे सुमारे ३० टक्के मुलांमध्ये पाठदुखीची तक्रार उद्भवण्यासोबतच, नेहमीसाठी पाठीचा कणा दुखावण्याचा धक्कादायक निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे.

First published on: 17-09-2014 at 06:17 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children having back pain due to load of school bag