आचारसंहितेमुळे का होईना, मात्र सिडको वसाहतीमधील राजकीय पक्षांच्या फलकांवर कारवाई  झाली. इच्छा नसताना नागरिकांना राजकीय पक्षातील पुढाऱ्यांचे चेहरे रोज सकाळी पहावे लागत होते. त्यातून आचारसंहितेच्या काळापर्यंत सामान्यांची सुटका झाली.
शुक्रवारी सकाळपासून सिडकोचे बांधकाम नियंत्रण पथकाच्या विभागाने ही कारवाई  केली. फलकबाजांनी सिडकोच्या कमानींचा आधार घेता अनेक चेहरे असलेले छायाचित्रांचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
शहराचे रुप विदृप करण्यात सर्वच राजकीय पक्षांची स्पर्धा  लागल्याचे या फलक युद्धामुळे दिसून आले. शहरातील करावली चौक, ज्येष्ठ नागरिक चौक, बस डेपो शेजारील चौक, सिडको  कार्यालयाचे कुंपण असो प्रत्येक चौकात ही स्पर्धा  नागरिकांना इच्छेविरुद्ध पहायला मिळाली. अखेर ५ मार्चपासून आचारसंहिता जाहीर झाली आणि सिडकोने शुक्रवारी (ता.७) ही कारवाई  केल्याने शहरातील विविध राजकीय पक्षांचे, कंपन्यांचे, कोचिंग क्लासेस बॅनर उतरविण्यात आले. त्यामुळे शहरातील चौकांचा गुदरलेला श्वास पुन्हा मोकळा झाला.