रायगड जिल्ह्य़ातील नयना क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोने आता लक्ष केंद्रीत केले आहे. १६ बांधकामांची यादी सध्या तयार करण्यात आली असून आठवडय़ाला दोन बांधकामे तोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याची ही कारवाई लवकरच सुरू होणार आहे. नयना क्षेत्रातील या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सिडकोने खासकरून नवीन शहर प्रशासक सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती केली आहे.
राज्य शासनाने नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या पेण, पनवेल, खोपोली या तालुक्यातील २७० नयना क्षेत्रात (नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र) सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. सिडकोने आरक्षण टाकण्यापूर्वी ग्रामस्थांनी आपल्या गावाशेजारीच्या मोकळ्या जागेत टोलेजंग इमारती उभारण्यास सुरुवात केली आहे. अशा ३०२ बांधकामांना सिडकोने यापूर्वी नोटिसा दिलेल्या आहेत.
त्याची ग्रामस्थांनी फारशी दखल घेतलेली नाही. त्यात राज्य सरकाराने ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांना दंड आकारून कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही बांधकामे दामदुपटीने वाढली आहेत. सिडकोने पनवेल तालुक्यातील ८ बांधकामांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे, पण तरीही बांधकामांची संख्या वाढत आहे. त्यामुळे १६ बांधकामांची यादी तयार करण्यात आली असून आठवडय़ाला दोन बांधकामांवर हातोडा चालविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याची तयारी करण्यात आली असून पुढील आठवडय़ात ही कारवाई होण्याची शक्यता आहे.नयना क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी खासकरून नवीन शहरांची प्रशासक म्हणून जबाबदारी असलेल्या दबंग सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा आणि ते काय करणार वगैरे याची यादी जाहीर करण्यात आली होती. पण केंद्रेकरांचा हा बार अगदीच फुसका निघाला असून सिडकोने आतापर्यंत म्हणावी अशी कामगिरी केलेली नाही. आता दिवसाढवळ्या उभ्या राहणाऱ्या काही इमारतींची पाडकाम केले जाणार आहे, पण ते केव्हा याबाबत सिडकोने भूमिका स्पष्ट केलेली नाही. केवळ नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीमागे लागलेल्या सिडकोचे वाढत्या अनधिकृत बांधकामांवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नयना क्षेत्रातील या बांधकामाबरोबरच नवी मुंबईतील २९ गावात तर लॅण्डमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला असून सरकारने या गावांना वाढीव एफएसआय जाहीर करण्याअगोदर त्यांनी ८ ते ९ एफएसआयची बांधकामे केलेली आहेत. यात सिडको, पालिका, आणि पोलीस यंत्रणा आपलं चांगभलं करून घेत आहे. नवी मुंबई पालिकेच्या निवडणूक काळात तर या बांधकामांना ऊत येणार आहे, पण त्याचे सोयरसुतक सिडकोला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
सिडको नयना क्षेत्रातील बांधकामांवर हातोडा चालविणार
रायगड जिल्ह्य़ातील नयना क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोने आता लक्ष केंद्रीत केले आहे.
First published on: 20-02-2015 at 12:37 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco to demolish illegal construction in naina sector