गुरुदेव फाऊंडेशन आणि लाईफ लाईन ब्लड बँकतर्फे इंदोरा चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील शंभराहून अधिक नागरिकांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. यावेळी गुरुदेव फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वनश्री वरभे म्हणाल्या, शहराची स्वच्छता ही प्रत्येक क्षेत्रातून व्हायला पाहिजे आणि वैद्यकीय क्षेत्राची ही मुख्य जबाबदारी आहे. गुरुदेव फाऊंडेशनतर्फे शहरात विविध ठिकाणी हे अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद माने यांनी याप्रसंगी केले. संस्थेतर्फे सिकलसेल व थॅलेसेमिया आजारावरसुद्धा जनजागृती मिरवणूक आणि पथनाटय़ सादर करण्यात येणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीष वरभे यांनी याप्रसंगी सांगितले.
या अभियानात महापालिकेचे आरोग्य निरीक्षक रोशन जांभुळकर, लाईफ लाईन ब्लड बँकेतील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव प्रवीण साठवणे यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.