लाड समितीच्या शिफारशीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आठवडाभरात २७० तर उर्वरित पदे दर महिन्याला प्रत्येकी २५ या प्रमाणे भरण्यात येणार आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया राबविताना सेवा ज्येष्ठतेनुसार ऐवजदार कमी करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले. आयुक्तांना सत्ता आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे आयुक्त आणि सदस्य यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. या वादातच महापौर अनिल सोले यांनी कोणत्याही ऐवजदाराला न काढता सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
सफाई कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. लाड समितीच्या शिफारशीनुसार ही पदे भरायवयाची असून त्या विषयावरील चर्चा चांगलीच रंगली. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी ८२० पदे रिक्त असल्याचे सांगितले. यावर प्रशासनाकडून आरोग्य उपसंचालक डॉ. गणवीर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या ३० दिवसांच्या आत संबंधिताला नोकरीवर घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, एका पदासाठी एकापेक्षा जास्त लोकांचे अर्ज आल्याने त्यात पेच निर्माण झाला असल्याचे गणवीर यांनी सांगितले. आतापर्यंत अनेक पदे भरण्यात आली नसून ती केव्हा भरण्यात येतील, असा प्रश्न उपस्थित करून दटके आणि सतीश होले यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आयुक्त श्याम वर्धने यांनी प्रशासनाची बाजू घेत आठवठाभरात २७० पदांवर लाड समितीच्या शिफारशीनुसार भरती करण्यात येईल आणि उर्वरित सदस्यांची भरती दर महिन्याला २५ या प्रमाणे करण्यात येईल. त्यांची नियुक्ती करताना सेवा ज्येष्ठतानुसार कनिष्ठ ऐवजदाराला कमी करण्यात येईल असे वर्धने यांनी सभागृहाला सांगितले. त्यावर सदस्यांनी त्यांना विरोध केला आणि जवळपास पंधरा मिनिट गोंधळ झाला. या गोंधळातच महापौर अनिल सोले यांनी कुठल्याही ऐवजदाराला कमी करण्यात येणार नसल्याचे सांगून भरती करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. शहराचा व्याप वाढत आहे. नरसाळा, हुडकेश्वरचा भाग महापालिकेत आला आहे. त्यामुळे सफाई कामगारांची आवश्यकता लागणार आहे. यामुळे कुणालाही कमी करण्यात येणार नाही असेही सोले यांनी सांगितले.
सफाई ऐवजदारांना मनपाने दिवाळीची जणू भेट दिली आहे. त्यांची मजुरी ५७ रुपयांनी वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत २६३ रुपये रोजंदारी देण्यात येत होती. आता ती ३२० रुपये करण्यात आली आहे.