खरेदी केलेल्या गाळय़ाची नोंदणी करण्याकामी ३ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना कराडच्या नगर भूमापन कार्यालयातील लिपिक रंगराव दगडोबा खराडे (वय ५७) हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाकडून रंगेहाथ पकडले गेले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार डॉ. विजय तानाजी जगताप (वय ३२) यांनी येथील कार्वे नाका परिसरात थोरात हॉस्पिटलशेजारी खरेदी केलेल्या टीपी स्कीम नं. १, स. नं. ३८९ प्लॉट नं. ७, उषाकिरण प्लाझामधील गाळा नं. ५ च्या दस्ताची नोंदणी होण्याकरिता भूमिअभिलेख कार्यालय कराड येथे अर्ज दिला होता. सदर नोंदणीचे काम नगर भूमापन कार्यालयातील लिपिक खराडे हे करीत होते. जगताप यांनी खराडे यांची नोंदणीच्या कामाच्या चौकशीकरिता भेट घेतली. यावर त्यांनी नोंदणीचे कामकाज करण्यासाठी तुम्हाला ४ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. याबाबत जगताप यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो सातारा येथे तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीत लोकसेवक रंगराव दगडोबा खराडे (वय ५७) परिरक्षण भूमापक, नगर भूमापन कार्यालय कराड यांनी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार जगताप यांच्याकडे तडजोडीअंती ३ हजार रुपयांची मागणी करून ती येथील नगर भूमापन कार्यालयात स्वीकारली. तेव्हा त्यांना रंगेहाथ पकडले असून, कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातारच्या अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, हवालदार पृथ्वीराज घोरपडे, आबा जाधव, सुभाष कुलकर्णी, सतीश सुभे, सावता राऊत, तेजपाल शिंदे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. श्रीहरी पाटील तपास करीत आहेत.