कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवडीतील गृहराज्यमंत्री सतेज पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यातील गटबाजीच्या राजकारणातून महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांत बंडखोरी होणार असल्याचे दिसू लागले आहे. स्थायी समितीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक रणजीत परमार यांच्या पाठिशी डझनभर नगरसेवकांचा गट उभा राहिला असून तो स्वतंत्र भूमिका बजाविण्याच्या पवित्र्यात आहे. केवळ महापालिकेतच स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यापुरते मर्यादित न राहता सतेज पाटील यांच्या राजकीय प्रवासात मोठा अडथळा आणण्याच्या हालचालीही या गटाकडून होणार असल्याचे दिसत आहे. गृहराज्य मंत्र्यांचा गट संभाव्य बंडखोरीबाबत फारशी चिंता करताना दिसत नाही. मात्र या घडामोडी पाहता जिल्ह्य़ातील काँग्रेस गटातटाच्या राजकारणात आणखीनच दुभंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवडीच्या राजकारणाने महापालिकेचे राजकारण संघर्षांच्या वळणावर येऊन ठेपले आहे. या वेळच्या स्थायी समितीसाठी परमार यांना संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. प्रत्यक्षात नाव जाहीर करताना त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली होती. स्थायी समितीमध्ये परमार यांना डावलल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे. अशातूनच महापालिकेत येन-केन कारणाने नाराज असलेल्या नगरसेवकांची मोट बांधण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डझनभर नगरसेवकांनी महापालिकेत काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये काही प्रमुख नगरसेवकांचाही समावेश असल्याने काँग्रेस अंतर्गत बंडखोरीच्या राजकारणाने संघर्षांची बीजे पेरली जात आहेत.
बदलत्या राजकारणाचा कानोसा घेता महापालिकेत आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे बरेचसे नगरसेवक सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. सध्या महापालिकेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पी.एन.पाटील,मालोजीराजे यांना मानणारे नगरसेवक आहेत. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यास सतेज पाटील यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत महापौर, उपमहापौर, स्थायीसह अन्य सभापती निवडण्यामध्ये त्यांचा वरचष्मा राहिला होता. त्यांचे वर्चस्व काही नगरसेवकांना खुपू लागले आहे. त्यामुळे सतेज पाटीलयांच्याविरुद्ध उघडपणे उभे राहण्याची भूमिका या नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.
त्याचाच भाग म्हणून सतेज पाटील यांना वगळून महाडिक-पी.एन.-मालोजीराजे यांचा नवा गट सक्रिय होऊ लागला आहे. गटातटातील संघर्ष आणि जुन्या निवडणुकीतील हिशोब भागविण्याचा भावनेतून नगरसेवकांचा नवा गट सतेज पाटील यांच्या विधानसभेच्या आखाडय़ात दंड थोपटून उभा राहणार आहे. विधानसभेची निवडणूक प्रथम असल्याने त्यांना प्रथम परीक्षा द्यावी लागणार आहे आणि महापालिकेची निवडणूक तीन वर्षांनंतर असल्याने आम्हाला परीक्षा देण्यास वेळ लागणार असल्याने विधानसभा निवडणुकीत जे करायचे ते करून दाखवू अशी भाषा आतापासूनच त्यांच्यातून व्यक्त होत आहे. निवडणुकीत जनता आम्हाला पास करत असताना नेते नापास करणार असतील, तर संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत परमार यांनी उघड संघर्षांचा इरादाच ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केला.
महापालिकेत स्वतंत्र गट होण्याच्या चर्चेने जोर धरला असला, तरी पालिकेच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला मात्र संभाव्य बंडखोरीची धास्ती वाटत नाही. दोन-चार नारोबांनी एकत्रित आल्याने फारसे काही बिघणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जात आहे. आपल्यावरील अन्यायाबाबत रणजित परमार यांनी सतेज पाटील, पी.एन.पाटील, मालोजीराजे या तीन नेत्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. समोरासमोर बसून चर्चा केल्यास त्यांचाही गैरसमज दूर होईल असे मत सतेज पाटील समर्थक, स्थायीचे माजी सभापती शारगंधर देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2013 रोजी प्रकाशित
स्थायी समिती निवडीतून कोल्हापुरात काँग्रेसमध्ये संघर्ष
कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवडीतील गृहराज्यमंत्री सतेज पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यातील गटबाजीच्या राजकारणातून महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांत बंडखोरी होणार असल्याचे दिसू लागले आहे.

First published on: 19-12-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict in congress due to choice of the standing committee in kolhapur