नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता भाजप आणि शिवसेनेसारख्या मित्रपक्षांसाठी लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची असताना ठाणे, नवी मुंबईसह जिल्ह्य़ातील भाजपचे कार्यकर्ते नेतृत्वा अभावी गोंधळलेल्या मनस्थितीत दिसू लागले आहेत. भाजपाच्या ठाणे विभाग अध्यक्षपदी पाच वर्षांपूर्वी नवी मुंबईतील बिल्डर सुरेश हावरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्य़ातील पक्षातील वेगवेगळ्या शहर अध्यक्षांना सोबत घेऊन हावरे पक्ष संघटना उभी करतील, अशी अपेक्षा नेतृत्वाने व्यक्त केली होती. मात्र, ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याशी दोनहात करून पुरते नि:ष्प्रभ ठरलेले हावरे ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत परदेशवारीसाठी रवाना झाल्याचे वृत्त असून १९ एप्रिल रोजी भारतात परतणार आहेत.
एकीकडे हावरेंची ही अवस्था असताना दुसरीकडे ठाणे भाजपमधील सुंदोपसुंदीमुळे प्रचारात कोणत्या गटाला स्थान द्यायचे, असा प्रश्न शिवसेनेपुढे उभा ठाकला आहे. लेले-वाघुलेंना पुढे करायचे तर पाटणकर नाराज आणि पाटणकरांना मान द्यायचा तर लेले हिरमुसणार. यामुळे भाजपच्या एकूण कार्यपद्धतीविषयी शिवसेनेत गोंधळ असून तुलनेने भाजपची डोंबिवली शाखा प्रभावीपणे काम करत असल्याने शिवसेनेसाठी हा एकमेव दिलासा ठरला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे तर भिवंडी, पालघर या दोन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार महायुतीतर्फे उभे आहेत. पालघरमध्ये भाजपचे नेतृत्व भिवंडी ग्रामीणचे आमदार विष्णू सावरा यांच्याकडे असल्याने याठिकाणी पक्षाला संघटनात्मक बांधणी आहे. भिवंडीत मात्र राष्ट्रवादीतून आयात केलेले कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने आधीच तोळामासा असलेल्या भाजपमध्ये फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्य़ात विधानसभेच्या तब्बल २४ जागा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत असावे, यासाठी नेतृत्वाने काही वर्षांपूर्वी ठाणे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी सुरेश हावरे यांच्याकडे सोपवली. नरेंद्र मोदी यांच्या एका सभेदरम्यान संघाची पाश्र्वभूमी असलेल्या हावरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातील सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्याशी दोनहात करण्याचा निर्णय घेतला. नव्यानेच भाजपमध्ये आलेले हावरे थेट नाईकांना भिडल्याने जिल्ह्य़ातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची उत्सुकता होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभवाला समोरे जावे लागल्यानंतर काही काळातच हावरे यांचे विमान जमिनीवर आले. ठाणे विभाग सोडा त्यांनी नवी मुंबईतही लक्ष घालणे बंद केले. लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत तर सुरेश हावरे कुटुंबियांसह परदेश दौऱ्यावर निघून गेल्याचे वृत्त असून ठाणे विभाग अध्यक्षच मैदानात नसल्याने भाजपमधील सावळागोंधळ आणखी वाढला आहे.

ठाण्यातील सुंदोपसुंदी
ठाणे शहरात मिलिंद पाटणकर आणि संदीप लेले यांच्या गटातील वाद टोकाला पोहचले असून पाटणकरांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे ठाणे शहर अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे प्रचार करताना कोणत्या गटाला आपलेसे करायचे, या विवंचनेत शिवसेनेचे नेते आहेत. प्रचार साहित्यावर स्थानिक नेत्यांचे छायाचित्र लावतानाही शिवसेनेचे नेते जपून पावले उचलत आहेत. ठाणे महापालिकेत भाजपचे आठ नगरसेवक असून यातील कुणाचाही पायपोस कुणात नाही, अशी स्थिती आहे. या नगरसेवकांची मदत मिळावी यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपकडून कार्यकर्त्यांना कार्यरत करू शकेल, असे स्थानिक नेतृत्वच नसल्याने संघातील काही जुन्या-जाणत्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र आहे. डोंबिवलीत मात्र आमदार रवींद्र चव्हाण आणि उपमहापौर  राहुल दामलेअंतर्गत मतभेद मागे ठेवून शिवसेनेच्या प्रचारात उतरल्याचे सध्याचे  चित्र आहे.