राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका व भिंगार छावणी मंडळाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षासाठी स्वागतार्हच आहे, त्यामुळे काँग्रेसला सर्वच जागांवर सुशिक्षित, कोणत्याही भानगडीत नसलेले नवे चेहरे देणे व चांगले उमेदवार देणे शक्य होणार आहे, स्वतंत्र लढण्यामुळे काँग्रेसच्या जागा निश्चीतच वाढलेल्या दिसतील, अशी बोचरी प्रतिक्रिया काँग्रेसच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनीही स्वतंत्र लढण्यासाठी काँग्रेसची पूर्वीपासूनच तयारी
आहे, कोणतीच अडचण जाणवणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नगर शहरात बूथ समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे सांगताना त्यांनी यानिमित्ताने श्रेष्ठी शहर जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निर्णय लवकर घेतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
महापालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे, तर भिंगार छावणी मंडळाची निवडणूक येत्या तीन-चार महिन्यांत अपेक्षित आहे. राज्य व केंद्र पातळीवर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसशी शहर पातळीवर अचानक आघाडी तोडत राष्ट्रवादीने दणका दिला आहे. काँग्रेसला अद्याप शहर जिल्हाध्यक्ष नियुक्त करता आलेला नाही. पक्षाचे बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे हे दोन्ही मंत्री शहरात लक्ष घालायला तयार नसल्याने नगरमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची अवस्था भांबावल्यासारखी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर देशमुख व ससाणे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. महापालिकेची प्रभाग रचना लवकरच होईल, या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले जाईल, निवडणुकीसाठी पक्षाचे दोन्ही मंत्री एकत्रच आहेत, राष्ट्रवादी स्वतंत्र असल्याने आता सर्व जागांवर स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्यासाठी पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला जाईल, असे देशमुख म्हणाले.
महसूलमंत्री थोरात आज नगरला
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उद्या (शनिवारी) नगरच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या उपस्थितीत काही खासगी कार्यक्रम, तसेच भिंगार छावणी मंडळाच्या प्रश्नावर नियोजन भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक व छावणी मंडळाच्या निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी ते काय प्रतिक्रिया व्यक्त करतात व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसा दिलासा देतात याकडे लक्ष राहणार आहे.