नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याविषयी आस्था वाढत असून त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीही वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी गटवार विविध स्पर्धा घेण्यात येणार असून निबंध स्पर्धेसाठी महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक वन्यजीव संवर्धनाकरिता भारताचे योगदान’, कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी ‘वन्यजीव व भारतीय संस्कृती’, तर माध्यमिक विद्यालयीन गटात इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वन्यजीव संरक्षणाकरिता लोकांचे कर्तव्य’ या विषयावर आणि इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वन्यजीव व निसर्गाची ओळख’ हे विषय राहणार आहेत. निबंध मराठीत असावा. निबंधास १०० गुण राहणार आहेत. महाविद्यालयीन गट, कनिष्ठ महाविद्यालयीन गट व माध्यमिक विद्यालयीन गट या सर्व गटाचे निबंध संबंधित शिक्षण संस्थेच्या प्रमुखांमार्फत स्थानिक संबंधित जिल्ह्य़ातील वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा स्थानिक उप-वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे ७ ऑक्टोबरपूर्वी पाठवावेत. बृहन्मुंबईच्या स्पर्धकांनी आपले निबंध उप-वनसंरक्षक (प्रादेशिक) ठाणे यांच्याकडे पाठवावेत. निबंध फूलस्केप कागदावर ५ सेंमी समास सोडून स्पर्धकांच्या हस्ताक्षरात असावा. पहिल्या पानावर स्पर्धकाचे नाव, गटाचे नाव, विद्यालय किंवा महाविद्यालयाचे नाव, इयत्ता ५वी ते ७वी, ८वी ते १०वी किंवा कनिष्ठ महाविद्यालय, असे नमूद करावे. निबंध परीक्षक मंडळाकडून तपासले जाईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील.
चित्रकला स्पर्धा ही विद्यालयीन, महाविद्यलयीन विद्यार्थी व मुक्त गटासाठी घोषवाक्यासह राज्यस्तर भित्तिचित्र स्पर्धा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या विषयावर राहील. सर्वसाधारण महाविद्यालयीन विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्यासह भित्तिचित्र स्पर्धा ‘मानव-वन्यजीव सहअस्तित्व’ या विषयावर राहील. माध्यमिक विद्यालयीन इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गवताळ प्रदेशातील वन्यप्राणी’, तर इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्गातील वन्यजीव आणि मी’ या विषयावर राहील. प्राथमिक विद्यालयीन इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘पक्ष्यांची घरटी’ हा विषय राहील. गट क्र. २ ते ४ च्या स्पर्धकांनी नियम क्र. ५ वाचावा. या गटातील स्पर्धकांनी (नियम क्र. ३ मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर) राज्यस्तरावर आपली चित्रे पाठवू नयेत. गट क्र. १ साठी भित्तिचित्र स्पर्धा राज्यस्तरावरची असल्यामुळे पारितोषिके राज्यस्तरावरच दिली जातील. गट क्र. १ साठी भित्तिचित्राचा आकार ५० सेंमी बाय ७० सेंमी असावा. गट क्र. १ ची भित्तिचित्रे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, वन भवन, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर ७ ऑक्टोबरपूर्वी पाठवावीत. गट क्र. २ ते ४ साठी चित्राचा वा भित्तिचित्राचा आकार ३३ सेंमी बाय ५० सेंमी असावा. गट क्र. २ ते ४ ची चित्रे संबंधित जिल्ह्य़ाच्या स्थानिक उप-वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे किंवा स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांच्याकडे ७ ऑक्टोबरपूर्वी पाठवावीत. बृहन्मुंबईच्या स्पर्धकांनी त्याची चित्रे उप-वनसंरक्षक (प्रादेशिक यांच्याकडे ७ ऑक्टोबरपूर्वी पाठवावीत. स्पर्धेच्या सर्व गटांसाठी शिक्षण संस्थेच्या प्रमुखाने स्पर्धकाने स्वत: चित्र काढले असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. चित्रासाठी क्रेयॉन, जलरंग, तैलरंग इत्यादी माध्यम वापरण्याची परवानगी आहे.
छायाचित्र स्पर्धेत मुक्त गटासाठी ‘पाणवठय़ावरील वन्यप्राणी’ हा विषय आहे. महाविद्यालयीन किंवा शालेय गटासाठी ‘स्वच्छंद पक्ष्यांचा समूह’ हा विषय राहणार आहे. ही स्पर्धा फक्त राज्यस्तरावरच आयोजित केली असल्याने पारितोषिके राज्यस्तरावरच देण्यात येतील. रंगीत छायाचित्र कमीत कमी २० सेंमी बाय २५ सेंमी आकाराचे असावे. छायाचित्राच्या मागील बाजूस योग्य शीर्षक, छायाचित्र घेतल्याची तारीख व वेळ, ठिकाण, वापरलेले भिंग, फिल्म इत्यादी माहिती असावी. छायाचित्राच्या मागील बाजूस डावीकडील वरच्या कोपऱ्यात स्पर्धकाचे नाव व पत्ता द्यावा. छायाचित्रे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, वन भवन, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावरच ७ ऑक्टोबपूर्वी थेट पाठवावीत. छायाचित्र चालू वर्षांतील व कोणत्याही स्पर्धेत पारितोषिकप्राप्त नसावे. गटानुसार पारितोषिके देण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याविषयी आस्था वाढत असून त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो.
First published on: 20-09-2013 at 07:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contest organized on wildlife week