तीर्थक्षेत्र विकास योजनेतील कामाच्या निधिवाटपाच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आज भडका उडाला. पूर्वी मंजूर झालेल्या कामांना निधी न देता, पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना डावलत, अलीकडेच मंजूर झालेल्या कामांना निधी दिल्याचे निमित्त त्याला मिळाले. या भडक्याला सभापती हर्षदा काकडे व सभापती शाहुराव घुटे यांच्यातील वादाचीही फोडणी मिळाली.
स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य सरकारने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासकामांच्या निकषात नुकतेच बदल केले आहेत. या निकषात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अहवालाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या कामांना नवीन निकषाप्रमाणे मंजुरी मिळवण्यासाठी जि.प. सदस्यांसह आमदारांनीही धावपळ केली व प्रस्ताव सादर केले. त्याला मंजुरी देण्यात आली. असे सुमारे ३२ प्रस्ताव सन २०१० पासूनचे होते. असे प्रस्ताव निधीच्या प्रतीक्षेत होते. परंतु पालकमंत्री मधुकर पिचड यांनी तीर्थक्षेत्र विकासाच्या ज्या कामांची यादी मंजूर केली, त्यात केवळ ११ कामांचा समावेश झाला आहे. एकाच तालुक्यातील तीन-तीन, चार-चार कामांना निधी उपलब्ध झाला आहे.
याला सभापती काकडे व सभापती बाबासाहेब तांबे यांनी आक्षेप घेतला. ऑक्टोबरमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजूर केलेल्या या कामांना लगेच नुकत्याच झालेल्या डीपीसीच्या सभेत निधी कसा वितरित करण्यात आला, पूर्वी मंजूर झालेल्या कामांना निधी प्रलंबित का ठेवला, याबद्दल लंघे यांच्याकडे दोघांनी विचारणा केली. लंघे व काकडे यांच्यात वाद सुरू असतानाच सभापती घुटे यांनी ‘तुम्हीही फाइल घेऊन फिरत जा’ अशी टिप्पणी केली, त्याला काकडे यांनी ‘तोंड सांभाळून बोला’ असे प्रत्युत्तर दिले. हा शेरेबाजीचा वाद पुढेही रंगू पाहात होता, परंतु लंघे यांनी हस्तक्षेप करून थांबवला. सभेनंतर तांबे यांनी लंघे व बांधकाम सभापती कैलास वाकचौरे यांची भेट घेऊन निधी वितरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांची भेट घेऊन कामे मार्गी लावण्याचे आश्वासन लंघे यांनी दिल्याचे समजले.
सभेत कोल्हापूर पद्धतीच्या जवखेड (पाथर्डी, ३७ लाख रु.), रवंदे (कोपरगाव, ३९ लाख रु.) व तांदळी दुमाला (३८ लाख रु.) या तीन बंधाऱ्यांना निधी उपलब्ध झाल्याने त्याच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सदस्य अण्णासाहेब शेलार, सुवर्णा निकम, बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
तीर्थक्षेत्र निधीवरून जि.प.त वादंग
तीर्थक्षेत्र विकास योजनेतील कामाच्या निधिवाटपाच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आज भडका उडाला. पूर्वी मंजूर झालेल्या कामांना निधी न देता, पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना डावलत, अलीकडेच मंजूर झालेल्या कामांना निधी दिल्याचे निमित्त त्याला मिळाले.
First published on: 08-02-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over pilgrimage fund in zp