जिल्ह्य़ात शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम अंमलबजावणीचा बराच गाजावाजा झाला. लावलेल्या रोपांची तपासणी होत असतानाच कागदोपत्री झालेल्या कामाचे पितळ उघडे पडले. उद्दिष्टाच्या तुलनेत ४ लाख रोपे लावण्यास तर खड्डे खोदलेच गेले नाहीत.
विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्य़ात ३१ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. यात जिल्हा परिषदेने सुमारे ११ लाख २ हजार रोपांची लागवड केली. वन विभागाने ११ लाख १ हजार रोपे लावली असल्याच्या नोंदी करण्यात आल्या. जि. प.अंतर्गत यंत्रणेला ५ तालुक्यांना तालुकानिहाय प्रत्येकी २ लाख ४० हजार रोपलागवडीचे उद्दिष्ट होते. रोप लागवडीची कागदोपत्री आकडेवारी पाहता औंढा नागनाथ व कळमनुरीने १०३ टक्के, वसमत ८८, हिंगोली ९६तर सेनगावने ७२ टक्के रोप लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याच्या नोंदी आहेत. ३१ लाख ५० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट असताना त्यासाठी आवश्यक खड्डय़ांची नोंद मात्र २७ लाख ७३ हजार १६३ होती. उद्दिष्टापेक्षा ४ लाख रोपांची लागवड खड्डय़ांत फसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्य़ात ९ हजार ८६२ ठिकाणी सुमारे २५ लाख ५२ हजार म्हणजे ८१ टक्के रोप लागवडीचे काम पूर्ण झाल्याची नोंद आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून रोप लागवडीची तपासणी करण्यासाठी शंभरापेक्षा अधिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. दि. ३० ऑगस्टपर्यंत जवळपास ८० टक्के तपासाचे काम झाले. ५० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी अहवाल सादर केला असता औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथे ७० टक्क्य़ांपेक्षा अधिक झाडे जगली, तर असोला गावात ५० टक्के झाडे सापडलीच नाहीत. सेनगाव तालुक्यात हीच स्थिती होती. येत्या आठ दिवसांत संपूर्ण तपासणी अहवाल जमा होण्याची शक्यता आहे.