scorecardresearch

डेंग्यू, मलेरियावरील नियंत्रणात पालिकेला अद्यापही अपयश

शहरात वाढणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नसून पालिका रुग्णालयात आजही २६ रुग्ण या डेंग्यूवर उपचार घेत आहेत.

शहरात वाढणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आलेले नसून पालिका रुग्णालयात आजही २६ रुग्ण या डेंग्यूवर उपचार घेत आहेत. पालिका रुग्णालयातली या संख्येबरोबर नवी मुंबईतील १०३ रुग्णालयात शेकडो रुग्ण या दोन आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. या दोन जीवघेण्या आजारांबरोबरच शहरात वाढलेल्या कचऱ्यामुळे आता साथीच्या अन्य आजारांची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. वाढत्या आजाराबद्दल पालिका प्रशासनाच्या विरोधात कोपरखैरणे येथे दोन दिवसांपूर्वी काही तरुणांनी कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते.
मुंबई, नाशिक, पुणे जिल्ह्य़ांत डेंग्यूने चांगलेच डोके वर काढलेले आहे. मुंबईत तर या आजाराने आतापर्यंत दहा जण दगावले आहेत. नवी मुंबईत ही संख्या एक असली तरी शासकीय व खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण आजही या दोन आजारांवर उपचार घेत आहे. नवी मुंबईची तीस वर्षांपूर्वीची ओळख मलेरियाचे शहर अशी होती. शेजारी खाडीकिनारा असल्याने मोठय़ा प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव या शहरात आहे. पालिकेने या आजारांवर यापूर्वी नियंत्रण मिळविलेले आहे. पण डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रमाणात या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे. चांगल्या पाण्यातील डासांमुळे डेंग्यूची लागण होत असून नवी मुंबईतील अनेक सोसायटीमध्ये अशी चांगल्या पाण्याची डबकी दिसून येतात. त्यामुळे पालिकेने काही दिवसांपूर्वी प्रत्येक घरात जाऊन फवारणी केली पण त्याचा म्हणावा असा उपयोग झालेला नाही. पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात सध्या १५०० ते १७०० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यातील सातआठ रुग्णांना मलेरिया किंवा डेंग्यूने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे. मलेरिया डेंग्यू आजारात प्लेटलेट कमी होण्याची प्रमाण वाढत असल्याने खासगी डॉक्टरांनी प्लेटलेट आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडे सातत्याने विचारणा सुरू आहे. त्यामुळे प्लेटलेट रक्ताचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.

नवी मुंबईतील मलेरिया डेंगीच्या रुग्णामध्ये आता घट झाली असून सध्या सात ते आठ रुग्ण आहेत. पालिकेने या आजारावर नियंत्रण मिळविले असून लवकरच ही साथ आटोक्यात येईल. नागरिकांना दक्षता घेताना चांगल्या पाण्याची डबकी घरात किंवा घराजवळ तयार होणार नाहीत याची काळजी घ्यावी उपचाराबरोबरच उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधीक्षक,
नवी मुंबई पालिका रुग्णालय वाशी.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त ( Mahamumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2014 at 08:18 IST
ताज्या बातम्या