शाळेतच लपवलेला तांदळाचा साठा सापडला
या जिल्ह्य़ातील वरझाडी येथील जिल्हा परिषद शाळेची शिवसेना कार्यकत्रे, गावकरी व पत्रकारांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता आदिवासी मुलांच्या शिष्यवृत्ती वाटपात मोठा गरप्रकार आढळला, तसेच १०१२-१३ मध्ये मुलांना दोनऐवजी एकच गणवेश वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. अत्यंत खेदजनक बाब म्हणजे, शालेय पोषण आहाराअंतर्गत मिळालेल्या तांदळाचा गैरव्यवहार करण्याच्या हेतूने शाळेतच लपवून ठेवलेला मोठा साठा आढळून आला. मुदतबाह्य़ झालेली चटणी, हळद, तेल वापरून मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांंच्या जीवनाशी खेळत असल्याचे गावकरी, शिवसेना कार्यकत्रे, अन्न निरीक्षक व पत्रकारांनी मिळून केलेल्या चौकशीत आढळून आले. यात केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, गटशिक्षणाधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचे बोलले जाते.
वरझडी गावातील पालकांनी अनेक तक्रारी शिवसेनेकडे केलेल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन शिवसेना भोसा विभागप्रमुख प्रशांत वकील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. नवलकिशोर राम यांनी ताबडतोब दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी आल्लेवार, उपशिक्षणाधिकारी मोतीकर यांना वरझडी शाळेत चौकशीसाठी पाठविले. परंतु, त्यांना शाळेत गरप्रकारासारखे काही कसे आढळले नाही, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. १० ऑगस्टला उपसभापती ननाताई येलके यांनी शाळेची पाहणी केली. त्यांच्यासोबत प्रशांत वकील हेही होते. गावातील पोषण आहार वाटपात मोठा घोळ आढळून आला. तांदळाचा १५ क्विंटल अतिरिक्त साठा आढळून आला. याची गंभीर दखल घेऊन सभापतींनी मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याबाबत  विस्तार अधिकारी डायरे यांना आदेश दिले. परंतु, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हे स्वतच या प्रकरणात अडकलेले असल्यामुळे ते प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
या साऱ्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे निराश होऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहार अधीक्षकांना चौकशीसाठी पाठविले. पण या प्रकरणात दोषी असणारे विस्तार अधिकारी डायरे हेही त्यांच्यासोबत कसे गेले, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. शालेय पोषण आहार अधीक्षक मनवर हे शाळेवर जाऊन शालेय पोषण आहाराची तपासणी न करता त्यांच्या अखत्यारित न येणाऱ्या बाबी जसे गुणवत्ता तपासण्यातच वेळ खर्च  करीत राहिले. या साऱ्या प्रकारामुळे गावकरी चिडले व त्यांनी मनवर यांना जाब विचारला असता मनवर व डायरे पळून गेले. १६ ऑगस्टला शिवसेनेचे प्रशांत वकील, अन्न निरीक्षक प्रफुल टोपले व नितीन कुळकर्णी, सरपंच चंद्रभान गाडेकर, शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षा वनिता चव्हाण, राजू धोटे यांनी शाळेतील धान्य साठय़ाचा पंचनामा केला असता त्यात मुदतबाह्य़ झालेले तेल, हळद, चटणी हे खिचडीत वापरले जात असल्याचे आढळून आले व नवे प्राप्त झालेले तेल, हळद, चटणी अल्प प्रमाणात दिसून आले. यावेळी गावतील प्रतिष्ठित नागरिक शेषराव जाधव, अतुल पत्रे, गोपाल चव्हाण, सिध्दार्थ नेवरे, गणेश जाधव, धनराज राठोड, प्रदीप चिंचोलकर व दीडशेवर गावकरी उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांनी दोषी मुख्याध्यापिका, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित न केल्यास गावकरी व शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला.